

कराड : कराड शहरातील शाहू चौक ते दैत्य निवारणी मंदिर मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात घडला. येथील मथुरा हॉटेल परिसरात उभा असणारा 18 टायर ट्रक अचानक मागे सरकत आला आणि पाठीमागील उभ्या असलेल्या पिकअप गाडीवर जाऊन आदळला. यामध्ये पिकअपचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील शाहू चौक ते दैत्यनिवारणी मंदिर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मथुरालगत पिकअप गाडी उभी होती. त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक 18 टायर ट्रकउभा होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रक अचानक मागे आला. काही कळणार इतक्यात ट्रॅकने पाठीमागील बाजूस उभ्या असलेल्या पिकअपला धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की पिकअपचे पाठीमागील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पिकअप गाडी कराड शहर पोलीस ठाणे परिसरात क्रेनच्या सहाय्याने आणण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम शहर पोलिस ठाण्यात सुरु होते.