

सातारा : जिल्ह्यात अगोदरपासूनच ‘पुस्तकांचे गाव’, ‘मधाचे गाव’, ‘फळांचे गाव’ अशा विविध प्रकारच्या गावांचा नावलौकिक झाला असताना आता सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब हे गाव ‘बियाण्यांचे गाव’ म्हणून उभारी घेत आहे. या गावाने मध्य प्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांना, तसेच महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा केला आहे. यामुळे गावाचा नावलौकिक वाढू लागला आहे. गावात सोयाबीन, घेवडा, ऊस, भुईमूग, गहू अशी विविध प्रकारची बियाणे विकसित केली जात आहेत. त्यामुळे चिंचणेर निंबची आता ‘बियाण्यांचे गाव’ म्हणून ओळख सर्वदूर झाली आहे.
चिंचणेर निंब हे गाव सातारा तालुक्यातील कृष्णेकाठी वसले आहे. गावची लोकसंख्या 2 हजार 239 इतकी असून, गावचे भौगोलिक क्षेत्र 510.78 हेक्टर आहे; तर 465.16 हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली आहे. गावात सरासरी 950 मि.मी. पाऊस पडत असतो. कोरोना काळात शेतीशाळेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्राम बीजोत्पादनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सहायक कृषी अधिकारी धनाजी फडतरे यांनी गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून महिला व पुरुष शेतकरी बचत गटांची स्थापना केली. शेतकरी गटांनी 2019 पासून बियाणे उत्पादन करण्यास सुरुवात केली.
पहिल्यांदा सोयाबीन या पिकामध्ये 12 हेक्टर क्षेत्रावर ‘केडीएस -726 फुले संगम’ या वाणाचे बीजोत्पादन केले. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. यानंतर शेतकऱ्यांनी सलग सोयाबीन, घेवडा, भुईमूग, गहू, ऊस या पिकांचे बीजोत्पादन घेण्यास सुरुवात केली. ग्राम बीजोत्पादन घेण्यासाठी शेतकरी गटांनी पहिल्यांदा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विभागाशी विविध वाणांकरिता करार केले.
प्रत्येक शेतकरी गटाकडे शासनाचा बियाणे उत्पादन व विक्रीचा परवाना आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, बुलडाणा, नंदुरबार, नागपूर, यवतमाळ, जालना, नांदेड, वाशिम, बीड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांत बियाण्यांची विक्री केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी केली त्यांना उत्पादनात वाढ झाल्याचा सकारात्मक अनुभव आला आहे. त्यामुळे हे शेतकरी पुन:पुन्हा याच गटांकडून बियाण्यांची खरेदी करत आहेत. त्यामुळे बियाण्यांची विश्वासार्हता वाढत चालली आहे. या बियाणे उत्पादनात गावातील 75 शेतकऱ्यांचा सहभाग आहे.
गावांमध्ये जेव्हापासून बियाणे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चात मोठी बचत केली आहे. सोयाबीन बीजोत्पादन घेण्यापूर्वी गावातील शेतकऱ्यांचे प्रतिएकर उत्पादन हे 6 क्विंटल होते. बियाणे उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये एकरी 14 ते 16 क्विंटल उत्पादन निघत आहे. बियाणे उत्पादन केल्यामुळे नियमित बाजारभावापेक्षा दुप्पट बाजारभाव मिळत आहे. यामुळे पड क्षेत्रही वहिवाटीखाली आले आहे. चिंचणेर निंब या गावाला आतापर्यंत जवळपास 500 हून अधिक शेतकऱ्यांनी विविध राज्यांतून व जिल्ह्यांतून भेटी दिल्या आहेत.