

सातारा : वसुबारस आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर आज सोमवारी पहिले अभ्यंगस्नान असल्याने आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. अतिउत्साहाच्या भरात फटाके फोडताना अपघात होऊन आनंदावर विरजण पडते आणि दुष्परिणामही कायमस्वरुपी असू शकतात. त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. यावेळी लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही असणे आवश्यक आहे.
पहिल्या अभ्यंग स्नानानंतर पहाटे आतषबाजीला सुरूवात केली जाते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतरही जोरदार आतषबाजी सुरू असते. लहान-मोठे असे सर्वचजण फटाक्यांच्या या आतिषबाजीचा आनंद घेत असतात. यावेळी राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानावर फटाके लावणे सुरक्षित ठरते. लहान मुले फटाके लावत असताना वडीलधाऱ्यांनी तेथे असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने तर दक्षता घेतली, तर अशा दुर्घटना टाळता येतील.
फटाकेमुक्त दिवाळीचाही संकल्प
सध्या फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थी घेत आहेत. दिवाळी म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा सण. वाईट प्रवृत्तींचा नाश हा या सणाचा उद्देश आहे. संपूर्ण वातावरणात मिसळलेला जीवघेणा धूर, धूळ आणि कानाचे पडदे फाडणारे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करण्याऐवजी सध्या फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करत असतील, तर निश्चितच ते कौतुकास्पद आहे.
फटाके फोडताना नको त्या क्लृप्त्या टाळा
दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांच्या उत्साहाला जणू भरती येत असते. यावेळी अनेक क्लृप्त्याही बालमंडळी शोधत असतात.
मग लोखंडी किंवा प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या, बॉक्सेस आदी फटाक्यावर ठेवून फटाका उडवणे, हातात फटाका फोडणे असे प्रकार मुले करू शकतात.
सर्व फटाके संपल्यानंतर न फुटलेले फटाके शोधतही बहुतेक चिमुकले हिंडत असतात. न फुटलेला फटाकाच हातात फुटून इजा होण्याची शक्यता असते.
त्यामुळे वडीलधाऱ्यांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.