Satara ZP : मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान स्वातंत्र्य दिनापासून

सातारा जिल्‍हा परिषदेचा अभिनव उपक्रम : डॉ. प्रिया शिंदे, राजूभय्‍या भोसले यांचा पुढाकार
Satara ZP
Satara ZP
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान’ राबवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी, शनिवार (दि. १५) ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा व विद्यालयांमध्ये शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजूभय्या भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वातंत्र्यदिनी सुरू होणार्‍या सातारा जिल्‍हा परिषदेच्‍या या अभिनव उपक्रमाची राज्‍यभर चर्चा होणार आहे.

अभियान केवळ अन्नभेसळ रोखण्यापुरते मर्यादित राहणार नसून सुरक्षित अन्नाची निवड, निरोगी आहाराच्या सवयी, स्थानिक व पारंपरिक अन्नसंस्कृतीचा स्वीकार, घरगुती भेसळ चाचण्या आणि अन्न सुरक्षेबाबत जनजागृती अशा विविध बाबींवर भर देण्यात येणार आहे. ‘प्रत्येक घर विषमुक्त स्वयंपाकघर, प्रत्येक गाव विषमुक्त गाव आणि संपूर्ण सातारा निरोगी सातारा’ हा अभियानाचा संकल्प आहे. अभियानाची अंमलबजावणी माहिती व जनजागृती, लोकसहभाग आणि स्पर्धा व प्रोत्साहन या तीन प्रमुख स्तंभांवर करण्यात येणार आहे.

दि. १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानाच्या समारोपानिमित्त गुढीपाडव्यादरम्यान ‘सातारा सरस महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महोत्सवात महिला बचत गटांची उत्पादने, भेसळ तपासणी प्रात्यक्षिके, आरोग्यदायी पाककलेची प्रात्यक्षिके, खाद्यपदार्थांचे स्टॉल, विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन तसेच उत्कृष्ट गाव, शाळा, महिला बचत गट व दुकानदारांचा गौरव करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सभापती लता कर्णे, ऋतुजा शिंदे, जि.प. सदस्य दिलीप बाबर, हणमंतराव जगदाळे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नागेश ठोंबरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news