.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा :
स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातांमधील बोटात घातलेल्या ज्या वाघनखांनी काढला होता, तीच वाघनखे स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या छत्रपतींच्या साताऱ्यात दिमाखात विराजमान झाली आहेत.
ही ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून साताऱ्यात दाखल झाली आहेत. मुंबई विमानतळावरून विशेष वाहनाने ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी संग्रहालयाबाहेर त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ही वाघनखे जनतेसाठी शनिवार, दि. २० जुलैपासून खुली होणार आहेत.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा छ. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर काढला होता. ही वाघनखे इंग्लंडमधील संग्रहालयात होती. ही वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्यात ही वाघनखे प्रथम ठेवली जाणार आहेत. तब्बल सात महिने ही वाघनखे साताऱ्यात राहणार आहेत. त्यानंतर ही वाघनखे कोल्हापूर व नागपुरात नेण्यात येणार आहेत.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून बुधवारी सकाळी १० वाजता ही वाघनखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाघनखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात सायंकाळी ही वाघनखे साताऱ्यासाठी आणण्यात आली.
घटक : पोलाद, चामडे व रेशीम
मोजमाप : लांबी ८.६ सेमी, खोली ९.५ सेमी, पट्टीची लांबी ७.५ सेमी, अंगठ्याचा व्यास २.५ सेमी (मोठी), २.३ सेमी (लहान)
नख्यातील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी) १.८ सेमी, १.८ सेमी, १.५ सेमी
एकूण वजन ४९ ग्रॅम
वाघनखं ठेवण्यात येणाऱ्या कक्षात नेण्यात आली. तेथे कस्टम अधिकारी, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी व संग्रहालय अभिरक्षक यांच्यासमोर या पेटीचे सील फोडण्यात आले. उपस्थितांना वाघनखं दाखवून ती पेटी पुन्हा बंद करण्यात आली. ज्या पेटीमध्ये वाघनखं प्रदर्शनाला ठेवले जाणार आहे त्याचे तापमान सेट केले जाणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा ही वाघनखे नियोजित ठिकाणी ठेवली जाणार आहेत. वाघनखे आल्यानंतर ते हताळण्यासाठीचे प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
साताऱ्यात वाघनखे दाखल झाली आहेत. शुक्रवारी शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. २० जुलै पासून ही वाघनखे सातारकरांना पाहता येणार आहेत. वाघनखाच्या सुरक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालयात विद्यार्थ्यांना येथे मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या शस्त्र प्रदर्शनाचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा.
जितेंद्र डुडी, (जिल्हाधिकारी)