Chandoli Wildlife Tourism | चांदोलीतही होऊ शकते ‘ताडोबा’सारखे पर्यटन

वाघांचे आगमन; पर्यटकांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देण्याची गरज
Chandoli Wildlife Tourism
Chandoli Wildlife Tourism | चांदोलीतही होऊ शकते ‘ताडोबा’सारखे पर्यटनPudhari File Photo
Published on
Updated on

आष्पाक आत्तार

वारणावती : ताडोबासारखे पर्यटन चांदोली आणि परिसरातही होऊ शकते. केंद्र, राज्य शासनाबरोबरच स्थानिक लोक, स्थानिक प्रशासन, सामाजिक संघटना, वन्यजीव अभ्यासक आदींच्या संयुक्तिक प्रयत्नातून पर्यटन विकासाला चालना दिली जाऊ शकते.

केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे ऑपरेशन तारा उपक्रमांतर्गत ताडोबातून एकूण आठ वाघ चांदोलीत आणले जाणार आहेत, त्यापैकी दोन आणले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच तीन नर वाघ आहेत 1, 2, 3, नावाने ते ओळखले जातात. आता गावकर्‍यांनी तसेच वन विभागाने त्यांची नावे सेनापती, बाजी आणि सुभेदार अशी ठेवली आहेत. या दोन वाघिणींच्या आगमनामुळे चांदोलीत पाचवर वाघ झाले आहेत. टप्प्या-टप्प्याने अजून सहा वाघ चांदोलीत आणले जाणार आहेत. त्यामुळे चांदोलीत आता एकूण 11 वाघ होतील.

दुसरीकडे वाढती बिबट्यांची संख्या मानव आणि वन्यजीव संघर्ष यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना वाघांच्या आगमनामुळे भीतीत भर पडली. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर ठोस उपाययोजना करून स्थानिक ग्रामस्थ तसेच नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यायला हवी. तरच ऑपरेशन तारा यशस्वी होईल .

अनुकूलन कुंपण म्हणजे काय?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोनार्लीजवळ साधारण दीड हेक्टर क्षेत्रामध्ये हा मानवनिर्मित बंदिस्त पिंजरा आहे. ऑपरेशन तारासाठी खास या अनुकूलन पिंजर्‍याची निर्मिती केली आहे. यात गवताळ प्रदेश, पाण्यासाठी छोटे तळे, खाद्य म्हणून प्राणी सोडले आहेत. साधारण वीस फुटांपर्यंत तारेचे उंच कुंपण आहे. त्यावर काटेरी तारा आहेत, जेणेकरून आतील प्राणी बाहेर जाऊ शकणार नाही. या क्षेत्रात पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे.

कोअर झोनमधून बफर झोनमध्ये प्रवास

ऑपरेशन ताराअंतर्गत ताडोबातून सह्याद्रीत दाखल झालेली पहिली चंदा वाघीण दोन दिवस अनुकूलन पिंजर्‍यात राहिल्यानंतर कोअर झोनमध्ये मुक्तझाली. सध्या तिचा प्रवास बफर झोनमध्ये सुरू झाला आहे. वन्यजीव विभागाच्या म्हणण्यानुसार ताडोबातील ही बोल्ड वाघीण आहे. तिला माणसांच्या सहवासाची सवय आहे. सध्या ती क्षेत्राची टेहळणी करू लागली आहे. कालांतराने ती क्षेत्र निश्चित करेल. दहा ते पंधरा दिवसांतच तिने परिसरात अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. पर्यटनाच्याद़ृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब.

रेडिओ कॉलर...

ताडोबातून आणलेल्या दोन्ही वाघिणींच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवले आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे या वाघांचा ठावठिकाणा समजण्यास मदत होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पथक 24 तास या वाघांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. अनुकूलन पिंजर्‍याजवळील सोनार्ली येथे तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कराड येथील कार्यालयात डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून या वाघांचे मॉनिटरिंग केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news