

चाफळ: विभागातील चाहुरवाडी (ता. पाटण) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवर सध्या मोठे संकट ओढवले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाणी थेट गावाशेजारील सार्वजनिक विहिरीत शिरले. त्यामुळे विहिरीतील पाणी पूर्णतः गढूळ व दूषित झाले असून ते पिण्यास अयोग्य ठरले आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील यांच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी गावासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी, या उद्देशाने भरीव निधी मंजूर करून गावाशेजारी विहीर खोदण्यात आली होती. मात्र या विहिरीत नैसर्गिक पाण्याचा साठा कमी असल्याने पर्यायी उपाययोजना म्हणून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील नदीपात्रात बोअरवेल घेण्यात आली. त्या बोअरमधील पाणी पाईपलाईनद्वारे विहिरीत सोडले जात होते.
त्यानंतर विहिरीतील पाणी मोटारीच्या सहाय्याने उचलून गावाशेजारील सार्वजनिक पाण्याच्या टाकीत साठवले जात होते. याच टाकीतून संपूर्ण गावाला नियमित पाणीपुरवठा केला जात होता. परंतु अलीकडील मुसळधार पावसामुळे ओढ्याचे गढूळ पाणी विहिरीत मोठ्या प्रमाणावर शिरल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. विहिरीतील पाणी गढूळ, चिखलयुक्त व दूषित झाल्याने ते वापरण्यास अयोग्य ठरले आहे.
या गंभीर परिस्थितीत गावातील काही तरुण व ग्रामस्थांनी पुढाकार घेत तात्पुरता उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल कोसमकर, शिवाजी जगदाळे, मारुती आबा पवार, शिवाजी पवार, चंद्रकांत चव्हाण, संजय थोरात, शिवाजी मारुती जगदाळे, शंकर विठ्ठल कडू, चंद्रकांत मारुती चव्हाण, सौ. कविता अंकुश पवार, सौ. पार्वती विठ्ठल पवार, सौ. सीमा राजेंद्र थोरात आदी ग्रामस्थांनी सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील बोअरमधून पाईपलाईन गावाच्या वेशीपर्यंत आणली. या माध्यमातून काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असून ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.