सातारा : प्रतापगडावरील अद्वितीय शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारी शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं राजधानी साताऱ्यात दाखल झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं सर्वप्रथम साताऱ्यात आणण्यात आली आहेत आणि ती आपल्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवली असून त्याचा अनावरण सोहळा आज, शुक्रवार दि. १९ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, सर्किट हाऊस ते शिवाजी संग्रहालय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती ऐतिहासिक वाघनखं मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारानगरीत आली आहेत. छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात दाखल झाली असून, ती सातारकरांना पाहण्यासाठी भव्यदिव्य कार्यक्रमाने खुली करण्यात येणार आहेत.
शुक्रवार, दि. १९ रोजी दुपारी १२.१५ वाजता 'शिव शस्त्र शौर्य गाथा या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, किल्ले रायगड प्राधिकरण अध्यक्ष श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तर खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, आ. प्रा. जयंत आसगावकर, आ. अरुण लाड, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्य पोस्टमास्तर जनरल किशन कुमार शर्मा यांच्यासह व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चेंड हे ही उपस्थित राहणार आहेत.
सातारा ही मराठ्यांची राजधानी असून छत्रपतींची गादी आहे म्हणून पहिला मान साताऱ्याला देण्यात आला आहे. ही वाघनखं साताऱ्यात ७ महिने असणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्किट हाऊसपासून शिवाजी संग्रहालय अशी रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शिवतीर्थ पोवई नाका येथे आल्यावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. या रॅलीत ढोल-ताशा, झांजपथक, शिंग-तुतारी असणार आहेत. त्यानंतर शिव शस्त्र शौर्य गाथा' या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण सोहळा पार पडणार आहे.
शिवरायांप्रती आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा, अभिमान, अस्मिता आहे. शिवरायांची वाघनखं देशात कुठेही न नेता सर्वप्रथम साताऱ्यात आणण्यात आली असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. यानिमित्ताने शासकीय विश्रामगृह ते संग्रहालय अशी रॅली काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आ. शिवेंद्रराजे भोसले