

सातारा : साताऱ्याच्या वाहतूक व्यवस्थेला कायमस्वरुपी दिलासा मिळावा या उद्देशाने राजपथ आणि राधिका रोड सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात येणार आहे. या विकास प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करुन आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या रस्त्यांची कामे मार्गी लावल्याने दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा देणे ही प्राथमिकता आहे. काम करताना नागरिक तसेच व्यापाऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेतली जाईल. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याच्या विकासाला निश्चित नवी दिशा मिळेल. या प्रकल्पासाठी येणाऱ्या सुचनांचा विचार करुन त्यानुसार बदल केला जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
सातारा पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृहात ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजपथ आणि राधिका रोड सिमेंट काँक्रेटीकरण प्रकल्पाबाबत गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक अविनाश कदम, जयवंत भोसले, धनंजय जांभळे, विजय देसाई, राजू गोरे, दिलीप म्हेत्रे तसेच व्यापारी उपस्थित होते. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सुरूवातील पीपीटीद्वारे नियोजित दोन्ही रस्त्यांच्या काँक्रेटिकरण कामाची माहिती दिली.
त्यानंतर मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राजपथ तसेच राधिका रोडलगत असलेल्या इलेक्ट्रीक व इतर केबल अंडग्राऊंड केल्या जातील. तशीच व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या लाईन, पावसाचे पाणी तसेच सांडपाण्याची केली जाणार आहे. राजपथाच्या फुटपाथची रुंदी कमी केल्याने रस्ताची रुंदी वाढणार आहे. त्यामुळे पार्किंगला अतिरिक्त जागा उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन फुटपाथ हे आधुनिक स्वरुपाचे केले जातील. राजपथ हा एकसारखा व्हावा, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. हे काम करताना डांबरीकरणापेक्षा थोडा वेळ लागतो. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याची आश्यकता आहे.
राजपथाचे काँक्रेटिकरण करताना राजवाडा परिसराचाही विकास करण्यात येणार आहे. काँक्रेटिकरण करताना काम पॅचमध्ये केले जाईल किंवा रस्त्याची एक बाजू पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले जाईल. आताचे रस्ते खोदून आणखी खाली घेऊन काँक्रेट रस्ता करण्यात येणार आहे. पार्किंग व वाहतुकीच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील. राधिका रोडला फारशा अडचणी येणार नाहीत. या कामांसाठी व्यापाऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कामाची गुणवत्ता सांभाळली जाणार आहे. पुण्यातील एजन्सी दोन्ही रस्त्यांच्या कामाचे डिझाईन बनवणार आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या सुचना व मांडलेल्या मुद्द्यांनुसार डिझाईनमध्ये बदल केले जातील.
भविष्यातील 40 वर्षांचा विचार करुन हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. साताऱ्यातील राजवाडा शोधूनही सापडत नाही. त्यामुळे राजवाडा येथील मैदानाचा विकास करुन त्याचा वापर नागरिकांना होईल, यादृष्टीने प्रयत्न आहेत. त्याठिकाणी सभा किंवा अतिक्रमणे होणार नाहीत. गोलबागेचाही विकास केला जाणार आहे. दोन्ही रस्त्यांवर असणाऱ्या हॉकर्सचे आवश्यक ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, असेही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. आवश्यक त्याठिकाणी महिलांसाठी शौचालये बांधण्यात येतील. सातारा बस सेवा सुरु करण्यासाठी नव्या 5 बसेस मिळाव्यात, अशी मागणी राज्य परिवहन मंडळाकडे केली आहे. व्यापाऱ्यांनी लेखी सुचना केल्यास दोन्ही रस्त्यांच्या डिझाईनमध्ये बदल करुन अंतिम बैठक घेतली जाईल असेही ना. शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी काही सुचना केल्या. राजपथावर प्रचंड वर्दळ असूनही पार्किंगसाठी जागा नाही. फुटपाथवर अतिक्रमणे वाढल्यामुळे लोक रस्त्यावरून चालतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉकर्सचे दोन्ही रस्ते तसेच चौकांमध्ये पुनर्वसन करू नये. अतिक्रमणांमुळे शहर बस वाहतूक सेवा बंद झाली आहे. या नव्या प्रकल्पाबद्दल माहिती नसल्याने सर्व व्यापारी बैठक घेऊन त्यामध्ये चर्चा करतील. त्यामध्ये येणाऱ्या सुचना कळवल्या जातील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही रस्त्यांच्या बाजूला रिडेव्हलपमेंट केल्यावर आवश्यक जागा सोडली गेली नाही. सेटबॅकमध्येही अतिक्रमणे आहेत. व्यापारी पेठांमध्ये आतल्या बाजूला पार्किंग सोडले जात असल्याने त्याचा नागरिकांना वापर करता येत नाही, याकडे अमित वाघमारे यांनी लक्ष वेधले.