

सातारा : व्यावसायिकाचा जीएसटी स्लॅबमध्ये फरक पडल्याने झालेला दंड व त्या दंडावरील व्याज माफ करुन देण्यासाठी वस्तू व सेवा (जीएसटी) भवन, सातारा या कार्यालयातील दोन राज्यकर निरीक्षक अधिकार्यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरुन सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहन सतीश देवकर (रा. देगाव ता.वाई) व अक्षय मोहन फडतरे (रा.देगाव ता.सातारा) अशी संशयित अधिकार्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, तक्रारदारांचा सन 2022-2023 मधील जीएसटी टॅक्स मधील टूबी, थ्री बी मधील फरक पडला. यामुळे जीएसटी कार्यालयाने त्यांना दंड केला. हा दंड कमी करण्यासाठी ते जीएसटी कार्यालयात अधिकारी रोहन देवकर व अक्षय फडतरे यांना भेटले. मात्र, दोघांनी संबंधित कामासाठी 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार दिली. तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.
एका अधिकार्याने लाच मागितली व दुसर्या अधिकार्याने लाचेसाठी अपप्रेरणा दिल्यामुळे सातारा एसीबीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुप्रिया गावडे, पोलिस निलेश राजपुरे, गणेश ताटे, निलेश चव्हाण, अजयराज देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.