

सातारा : बीम लाईटसह डोळ्यांना त्रास होणार्या इतर लाईटिंगला बंदी असतानाही सातार्यात गणेश आगमन मिरवणुकीत त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अजिंक्य लाईटचा मालक स्वप्निल भोसले (रा. कोडोली, सातारा) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 23 ऑगस्ट रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ रविवार पेठ, सातारा या मंडळाची आगमन मिरवणूक कमानी हौद येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आली. या मंडळाच्या पुढे डोळ्यांना हानिकारक होईल, अशी बीम लाईट सुरू होती. सातारा शहर पोलिसांनी तत्काळ ती लाईटिंग बंद करण्यास सांगितले.
पोलिस अधीक्षकांनी बीम लाईटसह डोळ्यांना त्रास होईल अशा इतर लाइटिंगवर बंदी घातली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सागर निकम यांनी लाईट चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
डीजे, बीम लाईटवर गुन्हे...
सातार्यात पोलिस दलाने बैठका घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना केल्या आहेत. दुसरीकडे डीजे चालक, बीम लाईट चालक सुसाट असल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवड्यात गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता शनिवारी शहर पोलिसांनी बीम लाईट चालकावर गुन्हा दाखल केला. यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास सुट्टी नसल्याचा पवित्रा पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.