

सातारा : चोरट्यांचे अजब फंडे थक्क करणारे आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी एकच कार (थार) अनेकांना विकून लाखोंचा गंडा घातला आहे. चोरटे ही विकलेली थार जीपीएस प्रणालीद्वारे पुन्हा शोधायचे आणि ती चोरी करून पुन्हा विकत होते. सुमारे सात महिने चोरीचा हा सिलसिला सुरू होता. बनावट कागदपत्रे व चावी तयार करून चोरट्यांनी अनेकांना हा गंडा घातला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज रामचंद्र जाधव (वय 42, रा. प्रतापसिंहनगर, सातारा), मोहित मोतीलाल मिनेकर (25) व रुक्साना मोहित मिनेकर (वय 22 दोघे रा. पाचगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप जाधव (रा. करंजे, सातारा) यांनी मूळ तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी, प्रदीप जाधव व संशयित युवराज जाधव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कोल्हापूरला लग्नाला जायला थार पाहिजे असे सांगून युवराज जाधव याने प्रदीप यांच्याकडून थार घेतली. मात्र, युवराजने थार परत न देता ती आपल्या मित्राला दिल्याचे सांगून वेळ मारुन नेली. गेले सात महिने थार दिलीच नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला. मात्र पोलिसांना ही थार सापडत नव्हती. दरम्यानच्या काळात तक्रारदार व पोलिसांनी कोल्हापुरात अधिक माहिती घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत गेली.
यातील संशयित मोहित मिनेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी देखील अशाच प्रकारे साथीदारांसोबत एकच वाहन अनेकांना विकून गुन्हे केले असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपुरी, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी गेली दोन महिने संशयिताचा शोध घेत सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील निपाणी, गदग, चिकोडी याठिकाणी तपास केला. अखेर चोरीची थार आजरा जि. कोल्हापूर याठिकाणी एका शेडमध्ये लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा पोलिसांनी थार जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले. संशयित विक्रीसाठी लागणारी बनावट कागदपत्रे बनवून थारची विक्री करत होते.
पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्याचे डीबीचे फौजदार सुधीर मोरे, पोलिस श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, आशुतोष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
जीपीएस ट्रॅकरमुळे समजायचे थारचे लोकेशन
थार विक्री करताना संशयित त्यास जीपीएस ट्रॅकर विशिष्ट प्रकारे लपवून लावत होते. त्यामुळे थार घेणाऱ्यास ते समजत नव्हते. थार विकल्यानंतर ती कुठे आहे हे जीपीएसमुळे संशयितांना समजत होते. त्यानंतर बनावट चावीने ते थार चोरत होते. अशाप्रकारे अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचा व तांत्रिकदृष्ट्या वापर केलेला असल्याने यातील संशयित व वाहन ताब्यात मिळत नव्हते. अखेर सातारा शहर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला.
चार-पाच लाखांपर्यंत ‘थार’ विकायचे
संशयितांनी कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक राज्यामध्ये संबंधित ‘थार’ लोकांना विकल्याचे समोर येत आहे. घरगुती अडचण असल्याचे सांगून अगदी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत संशयित थार विकायचे. यासाठी थारची बनावट कागदपत्रे तयार केली जायची. थार विकली की एक-दोन दिवसांत रात्री-अपरात्री जाऊन बनावट चावीने ती पुन्हा चोरायचे. यातूनच अनेक लोकांची फसवणूक केली आहे. वाहन चोरल्यानंतर ते काही दिवस, महिने लपवून ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.