

प्रतापगड : नाताळ हंगामामुळे महाबळेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीत आंबेनळी घाटात गुरूवारी भीषण अपघात झाला. अमरावती येथून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे 100 फूट खोल दरीत गेली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, अपघातानंतर बचावकार्यही राबवण्यात आले.
या घटनेत चालक निखिल शशिकांत पांढरीकर, शशिकांत माधवराव पांढरीकर, पल्लवी अभिजित काशीकर, यक्षीत अभिजित काशीकर व शरयू शशिकांत पांढरीकर हे जखमी झाले आहेत. आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच स्थानिक प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अत्यंत कठीण परिस्थितीत खोल दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात ट्रेकर्स टीममधील सुनिल भाटिया, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, अमित कोळी, अनिकेत वागदरे, सुजित कोळी, संकेत सावंत, ओंकार शेलार, आदित्य बावळेकर, साई हवलदार आणि दीपक ओंबळे यांसह अनेक स्वयंसेवक सक्रिय सहभागी झाले. जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात व साताऱ्यात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.