

सातारा : त्वचा सुंदर दिसावी, सुगंध टिकावा व आत्मविश्वास वाढावा. यासाठी अनेकजण दररोज विविध क्रीम्स आणि डिओड्रंट्सचा वापर सर्रास करतात. मात्र, या कॉस्मेटिक्स उत्पादनांमधील हानिकारक रसायनिक घटकांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगाचा धोका वाढतो. चांगल्या आरोग्यासाठी सुंदरतेसह सुरक्षितता गरजेची असल्याने क्रीम्स, लोशन्सचा अतिरेकी वापर टाळणे आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीमध्ये बाह्य सौंदर्याला अधिक महत्व दिले जात आहे. सुंदर दिसण्यासाठी व सौंदर्य टिकवण्यासाठी विविध क्रीम्स, लोशन्स तसेच सुवासिकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतही सौंदर्यप्रसाधनेशी निगडीत हजारो उत्पादने सहज उपलब्ध आहेत. तज्ञांच्या अभ्यासानुसार, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आढळणारे पॅराबेन्स, ट्रायक्लोसन, फॉर्मल्डिहाइड व बेन्झिन यांसारखे केमिकल्स त्वचेवाटे शरीरात प्रवेश करतात आणि दीर्घकाळात हार्मोन्सचे संतुलन बिघडवून स्तन, त्वचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका बळावतो. मस्कारा व आयलाईनरमध्ये आढळणारे कार्बन ब्लॅक हे घटक आरोग्यासाठी हानीकारक आहेत. केसांच्या रंगांमधील रसायने थेट त्वचेच्या संपर्कात येतात. केस रंगवण्याच्या प्रक्रियेदरम्यान होणारा धूर, वासाच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
नियमित वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंट्स आणि लोशन्समधील सुगंधी घटक शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनसारखे कार्य करतात. त्यामुळे पेशींच्या अनियमित वाढीचा धोका बळावतो. सौंदर्य प्रसाधनांचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नाही. परंतु, उत्पादनातील घटक व आरोग्य यांची योग्य माहिती घेवून सुरक्षित पर्यायांची निवड केल्यास रसायनांमुळे होणारा संभाव्य कर्करोगाचा धोका टाळू शकतो. त्वचेच्या सुंदरतेबरोबर आहार, व्यायाम व मानसिक आरोग्यावर लक्ष दिल्यास आत्मविश्वास वाढून व्यक्तीमत्व खुलते.