

कराड : येथील वाखाण परिसरातील रूक्मिणी गार्डनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी रोख रक्कम तसेच दागिने असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
योगेश वसंतराव महाडीक यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बेडरूममधील कपाटात असलेले चार हजार रूपये तसेच 25 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅमचे सोन्याचे मणी व लगड, चांदीचे निरंजन तसेच सोन्याचे गंठण असा ऐवज चोरून नेला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे वाखाण परिसरात खळबळ उडाली असून बुधवारी सायंकाळपर्यंत चोरट्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते.