

वेणेगाव: खालची पिलाणी, ता. सातारा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी सकाळी बैल व बिबट्याची जीवघेणी झुंज झाली. चवताळून हल्ला करणार्या बिबट्याचा दोन बैलांनी तितकाच कडवा प्रतिकार केला. या जीवघेण्या झुंजीत एका बैलाचे शिंग मोडले असून तो रक्तबंबाळ झाला.
बैलाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शेतकर्यांचा आरडाओरडा व बैलांचा कडवा प्रतिकार यामुळे अखेर बिबट्याने धूम ठोकली. डोंगराच्या पायथ्याशी हा थरारक प्रकार घडला. दरम्यान, जीवाच्या आकांताने बैलांनी केलेला प्रतिकारही कौतुकाचा ठरला, तर बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकरी हादरले आहेत.
खालची पिलाणी येथील सरपंच जयवंत कदम यांचे वडील बळीराम कदम हे शनिवारी सकाळी डोंगरात दोन बैल चरावयास घेऊन गेले होते. अकरा वाजण्याच्या सुमारास बैल चरत असताना ते झाडाखाली विश्रांतीस बसले होते. यावेळी काही अंतरावर विपरीत घडत असल्याची चाहूल त्यांना लागली. कसला तरी भेदरणारा आवाज त्यांच्या कानी पडला. लांबूनच त्यांनी कानोसा घेतला तर त्यांचे दोन्ही बैल व बिबट्याची
झुंज सुरु असल्याचे दिसले. बिबट्या चवताळून बैलांवर हल्ला करत होता. त्याचवेळी दोन्ही बैलही त्याला कडवा प्रतिकार करत हल्ला परतवून लावत होते. त्यांच्यामध्ये जोरदार झुंज सुरु होती. त्वेशाने ते एकमेकांवर धावून जात होते. या झुंजीत राजा बैलाचे एक शिंग तुटले. ‘राजा’ रक्ताने माखला.
त्याच्या शरिरावरही बिबट्याच्या नख्यांमुळे गंभीर जखमा झाल्या. बिबट्या पुन्हा पुन्हा मागे फिरुन राजा बैलावर हल्ला करत असतानाच हा थरारक प्रसंग दुरुन पाहणार्या शेतकर्यांनी आरडाओरडा केला. शेतकर्यांच्या आरडाओरडीमुळे आणि बैलांच्या प्रतिकारामुळे अखेर बिबट्या पळून गेला. परंतु तोपर्यंत राजा बैलाच्या पाठीवर खोल जखमा झाल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच सातारा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भूषण गावंडे, संभाजी दहिफळे, पोलीस पाटील सत्यवान मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी बैलाची माहिती घेत पंचनामा केला. बिबट्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत खालची पिलानी येथे बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात संपत कदम यांची गाय ठार झाली होती. बिबट्याने गावातील अनेक कुत्री फस्त केली आहेत. बैलावर हल्ला होणे ही या परिसरातील मोठी घटना असून यापुढे मानवी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.