

सातारा : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची कर्नाटकातील होदिगिरे (जि. दावणगिरी) येथे उघड्यावर समाधी असून त्या ठिकाणी भव्य समाधी बांधली जावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. त्यांनीच यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.
दै. ‘पुढारी’ ने स्वराज्य संकल्पक भोसले यांच्या जयंतीदिनी ‘कर्नाटकातील शहाजीराजेंची समाधी दुर्लक्षित’ या मथळ्याखाली दि. 18 मार्चच्या अंकात विशेष वृत्त प्रसिध्द केले होते. मोगल, निजाम, आदिलशाही अशा पादशहांचे मांडलिकत्व झुगारुन हक्काचे, सामान्य रयतेचे राज्य यावे, यासाठी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या शहाजी महाराजांची साडेतीनशे वर्षांपूर्वीपासून कर्नाटकातील होदिगिरे गावात उघड्यावर असलेल्या समाधीचे सुशोभिकरण करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आ. जयंत पाटील यांनी विीधमंडळ अधिवेशनात समाधीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतचा मुद्दा उपस्थित केला.
आ. जयंत पाटील म्हणाले, सिमोग्यावरुन एक तासाच्या अंतरावर होदिगिरी येथे 1664 साली घोड्यावरुन पडून शहाजी महाराजांचा मृत्यू झाला. या ठिकाणी त्यांची अत्यंत साधी समाधी आहे. या समाधीकडे बांधकाम मंत्री म्हणून ना. शिवेंद्रराजेंनी लक्ष घालावे. शहाजी महाराजांच्या पराक्रमाला शोभेल अशी चांगली समाधी त्या ठिकाणी बांधा. ना. शिवेंद्रराजे हे छत्रपतींच्या गादीचे वारसदार आहेत, असे आम्ही मानतो, म्हणून आम्ही ही मागणी त्यांच्याकडे करत आहोत, त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी ना. शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, हे मानण्याची गरज नाही, तेच आहेत, असे ठणकावून सांगितले. त्यावर आमच्यासाठी ना. शिवेंद्रराजेच छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजे माझ्यावर चिडू नयेत, म्हणून मी जास्त बोलत नाही, असेही आ. जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कामे केलेल्या कंत्राटदारांची बिले शासनाने अजून काढलेली नाहीत. अजून काही काळ बिले दिली गेली नाहीत तर कंत्राटदारांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु होईल. त्याआधी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्थमंत्र्यांशी चर्चा करुन कंत्राटदारांची बिले काढावीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा निर्णय करावा, अशी मागणीही आ. जयंत पाटील यांनी केली.