

सातारा : सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक मोठी सकारात्मक घटना गुरुवारी घडली. सातारा जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ‘जीएनएम’चे (General Nursing and Midwifery) श्रेणीवर्धन करून बी.एस्सी. (नर्सिंग) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यास केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय नर्सिंगचे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्यात बीएस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरवा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्याचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या अभ्यासक्रमास मान्यता दिली. याआधी, मुंबई वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने एक तज्ज्ञ समिती पाठवून सातारा जिल्हा रूग्णालयाच्या सुविधा तपासल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिकवण्याचे वर्गखोल्या, प्रयोगशाळा, रूग्णांसाबतचा सराव, ग्रंथालय आणि इतर आवश्यक तरतुदींचे निरीक्षण केले होते. त्यानंतर समितीने या रूग्णालयांतर्गत बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याची शिफारस केली.
सातारा जिल्ह्याला बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज मिळाल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात हा निर्णय जिल्ह्याच्या विकासाची एक सुवर्णमोहोर ठरली आहे.