

मेढाफकेळघर : बोंडारवाडी धरण 1 टीएमसी करण्यासाठी सरकार आग्रही आहे. यासाठी चार गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोंडारवाडीबद्दल दिलेला शब्द पाळण्यासाठी ते तयार आहेत. ट्रायल पीटसाठी सांमजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. सर्व प्रश्नांवर तोडगा काढू. स्व. विजयराव मोकाशी यांचे बोंडारवाडी धरणाच्या लढ्याला यश येत नाही. तोपर्यंत आपण मागे हाटायचे नाही, असा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
नांदगणे, ता. जावली येथे बोडारवाडी धरण कृती समितीचेवतीने ना. शिवेंद्रराजे यांचा 54 गावच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र मोकाशी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, इतिहासकार श्रींमत कोकाटे, विलासबाबा जवळ, बापूराव पार्टे, राजेंद्र धनावडे, सागर धनावडे, रामभाऊ शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, स्व. विजयराव मोकाशी हे आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सर्वांना प्रेरणा देत राहतील. बोंडारवाडी धरण 1 टीएमसी करण्याबाबत राज्य सरकार आजही आग्रही आहे. अडचण फक्त चार गावांची आहे. भूतेघर वाहिटे, बोंडारवाडी, या गावच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे महत्वाचे आहे. पुनर्वसनाचा प्रश्न आल्याने आपला फार विस्थापित करू नका, थोडी फार भिंत वर खाली करता येते का ते पहा आमच्या जमिनी जास्त जाऊ देऊ नका, असे या गावांचे म्हणणे आहे.
याचबरोबर या गावांचे आपल्याच तालुक्यात कसे पुनर्वसन करता येईल, यासाठी मी जातीने लक्ष घालून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या चार गावच्या लोकांना आपल्या लोकांतून बाहेर जाणार नसल्याची खात्री होईल. यासाठी स्थानिक पातळीवरही सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी लागेल. ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा - जावलीची मायबाप जनता माझ्या पाठीशी गेली पाच टर्म आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी नेहमी कटीबध्द आहे. जनता खबीरपणे उभी राहिल्याने आज मला महाराष्ट्रात दोन नंबरचे मताधिक्य मिळवता आले. त्यांच्या कामाची पोचपावती शब्दात मांडणे हे शक्य नाही, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले. यावेळी सदाशिव सपकाळ, राजेंद्र मोकाशी, विलास जवळ, वैभव ओंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक लकडे यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र ओंबळे यांनी प्रास्ताविक केले.