

अविनाश कदम
खटाव : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर होताच विविधांगी चर्चा सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्याला पक्षाने दोन मंत्रीपदे दिली आहेत, त्यातच साताऱ्यासह सांगलीतूनही अनेक दिग्गज इच्छुक असताना भाजप पक्षश्रेष्ठींनी धैर्यशील कदमांच्या उमेदवारीला झुकते माप दिले आहे. जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पक्षातील वजन आणि शिष्टाई कदमांच्या उमेदवारीला कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सातारा-सांगली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यावर पक्षाकडून उमेदवारी देताना सातारा की सांगली जिल्ह्याचा विचार होणार, दोन्हीपैकी कोणत्या जिल्ह्याला प्राधान्य मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. जिल्ह्यातील पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांवरही भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. एकूणच सातारा जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन आले आहेत. सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कमी आहे. सांगलीत पक्षाचे वर्चस्व वाढवण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून झुकते माप दिले जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र साताऱ्यातील खा. उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे आणि मंत्री जयकुमार गोरेंचे प्रयत्न निर्णायक ठरुन धैर्यशील कदम यांना संधी मिळाली आहे.
विधानपरिषदेच्या सातारा- सांगली मतदारसंघासाठी भाजपकडून धैर्यशील कदम, सुनील काटकर, शेखर गोरे, विक्रम पावसकर, रणजीत निंबाळकर तर सांगलीतून पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडीक यांची नावे चर्चेत होती. धैर्यशील कदमांच्या उमेदवारीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सुनील काटकरांसाठी खा. उदयनराजे भोसले तर सांगलीच्या पृथ्वीराज देशमुखांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वजन वापरल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अगोदरच ते विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते.
सातारा झेडपीवर सत्ता स्थापन करताना भाजपच्या जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला मुत्सद्दीपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच विचारात घेतल्याचे धैर्यशील कदमांना मिळालेल्या संधीवरुन दिसत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपचा उभा केलेला झंजावात, सातारा जिल्ह्यात भाजपवाढीसाठी केलेली मेहनत ध्यानात घेता फडणवीसांकडून विधानपरिषदेची उमेदवारी ठरवताना मंत्री गोरेंच्या भूमिकेला झुकते माप दिल्याचेही अधोरेखित होत आहे. उमेदवारी मिळालेले धैर्यशील कदम यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून उठावदार काम केले होते. त्यांचे खा. उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे आणि मंत्री गोरे यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातून कदम इच्छुक होते, मात्र वरिष्ठांचा आदेश मानून आ. मनोज घोरपडेंसाठी थांबणे पसंत केले होते. आता त्यांना संधी देणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी निदर्शनास आणून दिल्यानेच धैर्यशील कदमांचे घोडे गंगेत न्हाले आहे.