Shivendraraje Bhosale | जिल्ह्याच्या विकासाची घडी भाजपनेच बसवली : शिवेंद्रराजे भोसले

मोदी, फडणवीस यांच्यामुळेच साताऱ्याला दिशा
Shivendraraje Bhosale |
ना. शिवेंद्रराजे भोसले Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासूनची बिघडलेली विकासाची घडी आता व्यवस्थित बसवली आहे. जिल्ह्याचा विकासरथ वेगाने दौडू लागला आहे. त्यावर स्वार होऊन जनता नागरी सुविधा व विकासकामांचा अनुभव घेत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास यासारख्या मूलभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागल्या आहेत.

भाजपने शेतकरी, युवा, महिला व सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या. जनतेला अपेक्षित असलेला स्वप्नवत विकास आता दृष्टीक्षेपात आला आहे. आगामी काळातही विकासाचा हा आराखडा राबवला जाणार आहे. जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, भाजपमुळे सातारा जिल्ह्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलू लागला आहे. मी भाजपात आलो, तेव्हा काही जण म्हणाले, वेगळ्या प्रवाहात जात आहात; पण आज तोच प्रवाह साताऱ्याच्या विकासाचा मुख्य प्रवाह झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारने सातारा जिल्ह्यावर निधीचा पाऊस पाडला. रस्ते, पूल, सार्वजनिक बांधकामे, पाणीपुरवठा, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण प्रत्येक क्षेत्रात विकासाची चाके फिरली, हे कोणीही नाकारू शकत नाहीत. ज्या जिल्ह्यात पूर्वी फाईली धूळ खात होत्या, त्या आम्ही हलवल्या. निर्णय घेतले, निधी आणला आणि कामं करून दाखवली.

ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, भाजपच्या सरकारने सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरीब, माता-भगिनी, युवक आणि ‌‘लाडकी बहीण‌’ यांच्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे साताऱ्यातील घराघरांत बदल जाणवू लागले आहेत. लोकांच्या खिशात पैसा राहू लागला, आत्मविश्वास वाढला. हे फक्त भाषणातून नाही, तर धोरणातून घडले आहे. सातारा जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा वेगवान व सुखकर झाली आहे. खाचखळग्यांचे रस्ते महामार्गासारखे धावू लागले आहेत.

साताऱ्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणूनही नावारूपास आली आहे. महाबळेश्वर, कास पठार, प्रतापगड, सज्जनगड येथे वाढणारी गर्दी, स्थानिक तरुणांसाठी निर्माण होणारे रोजगार, ही भाजपच्या विकासदृष्टीचीच फलश्रुती आहे. साताऱ्याला मागे नेण्याची ताकद कोणातही नाही, पण विकास रोखायचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. आज केंद्रात मोदीजी, राज्यात फडणवीससाहेब आणि जिल्ह्यात भाजपाची ताकद आहे. ही साखळी तुटली, तर विकास थांबेल. आणि साताऱ्याचा विकास थांबवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही ते म्हणाले.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, घरातील माणसाला जसं संकटात एकटं सोडलं जात नाही, तसं मी साताऱ्याला कधीही सोडलं नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे केवळ सत्ता भोगली, त्यांनी साताऱ्याला काय दिलं, हा प्रश्न आज जनतेने विचारायची वेळ आली आहे. नगरपालिका असो, नगरपंचायत असो, सहकारी संस्था असोत किंवा छोट्या-मोठ्या निवडणुका आज साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकतो आहे. हे यश कोणाच्या भीतीमुळे नाही, कोणाच्या कृपेने नाही; हे यश विकासामुळे आणि भाजपाच्या ताकदीमुळे आहे. सातारा जिल्ह्याचा विकास पाहायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकण्यासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी रहा, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news