

कराड : कराड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत भाजपचा झेंडा फडकला. सभापतीपदी विंग गणातील नंदाताई यादव तर उपसभापतीपदी वाघेरी गणातील अनिता वेताळ विजयी झाल्या. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात सभापतीपदासाठी भाजपच्या नंदाताई यादव यांना 13 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या स्वाती थोरात यांना 10 मते मिळाली.
उपसभापती पदाच्या निवडीत अनिता वेताळ यांना 13 तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र बडेकर यांना 11 मते मिळाली. 13 सदस्यांपैकी 8 सदस्य संख्या असणाऱ्या आ.डॉ.अतुलबाबा भोसले गटाला सभापतीपद तर 5 सदस्य संख्या असणाऱ्या आ.मनोजदादा घोरपडे गटाला उपसभापती अशी राजकीय तडजोड करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
कराड पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी मतदान प्रक्रिया पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल म्हेत्रे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी काम पाहिले. सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. भाजपमधून विंग गणाच्या नंदाताई यादव तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कालवडे गणाच्या स्वाती थोरात यांनी अर्ज दाखल केला होता. हात उंचावून मतदान घेण्यात आले. या मतदानात नंदाताई यादव यांना 13 मते मिळाली तर स्वाती थोरात यांना 10 मते मिळाली. काँग्रेसचे सदस्य संग्राम पवार हे तटस्थ राहिले.
उपसभापती पदासाठी भाजपकडून वाघेरी गणाच्या अनिता वेताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेसकडून वारुंजी गणाचे रवींद्र बडेकर यांनी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी झालेल्या मतदानात अनिता वेताळ यांना 13 मते मिळाली तर रवींद्र बडेकर यांना 11 मते मिळाली. 24 सदस्यसंख्या असलेल्या कराड पंचायत समितीत 13 सदस्य भाजपचे निवडून आले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती पदांवर भाजपचा दावा मजबूत होता. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गटाचे 8 सदस्य तर आमदार मनोजदादा घोरपडे गटाचे 5 सदस्य असे संख्याबळ असल्याने भोसले गटाला सभापतीपद तर घोरपडे गटाला उपसभापतीपद देण्याचा निर्णय झाला. कराड पंचायत समितीच्या इतिहासात 64 वर्षानंतर प्रथमच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कराड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला .
कराड दक्षिणमधील येरवळे गावच्या सौ. नंदाताई यादव यांची सभापतीपदी निवड झाल्याने या गावाला पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान मिळाला आहे. तर कराड उत्तरमधील सुर्ली गावच्या सौ. अनिता वेताळ यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने त्या गावालाही प्रथमच उपसभापतीपदाचा मान मिळाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
दरम्यान डॉ. सुरेशबाबा भोसले व आ. मनोजदादा घोरपडे यांनी नुतन सभापती, उपसभापती यांचे सभागृहात उपस्थितीत राहून अभिनंदन केले. यावेळी जि.प.सदस्य मनोज काळभोर, रणजीत जाधव, लालासाहेब जगदाळे, संग्रामबापू घोरपडे, अमोल पवार, संतोष वेताळ, तुकाराम नलवडे, योगीराज सरकाळे, राहूल पाटील, मोहनराव माने, महेशबाबा जाधव, प्रमोद कदम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पिनू जाधव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव तसेच भाजपाचे पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.