Shivendraraje Bhosale | भाजपच्या माध्यमातून साताऱ्यात विकासपर्व : ना. शिवेंद्रराजे भोसले
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी रहा. सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. खड्डे मुक्त सातारा शहरासाठी भाजपला साथ द्या. भाजपच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व साताऱ्यात उभारले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे उमेदवार शेखर मोरे-पाटील, अनिता फरांदे यांच्या प्रचारार्थ कामाठीपुरा, संत गाडगेबाबा मठ, कोलाटी वस्ती, हॉस्पिटल, गोडोली बाग, अजिंक्यतारा स्वागत कमान, मेहरबान आळी, भैरवनाथ मंदिर, चव्हाटा, गोडोली जकात नाका, शिवनेरी कॉलनी, बीएसएनएल ऑफिस या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा शहरात सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. विरोधक केवळ निवडणुकीपुरते उगवतात. त्यामुळे मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी व सातारा शहराचा विकासात्मक कायापालट अखंडित ठेवावा, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, या पदयात्रेला गोडोली व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी ना. शिवेंद्रराजे, अमोल मोहिते, शेखर मोरे - पाटील व सर्व उमेदवारांचे स्वागत केले. भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

