

वेलंग : वाई नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ असतानाही अपक्षाच्या नादाला लागून आपले लोक सुरक्षित न ठेवता बेफिकिरी दाखवल्याने राष्ट्रवादी तोंडावर पडली. अपक्षाला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याने राष्ट्रवादीतील बंडखोराला आपल्याकडे खेचत भाजपने राजकारणातले सगळे डावपेच पणाला लावत नगराध्यक्षपदा सोबत उपनगराध्यक्षपदही आपल्याकडे खेचून आणले. नगराध्यक्षपदाचे एक मत आणि एक कास्टिंग मत या बळावर भाजपच्या नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षपदही खेचून आणले. त्यामुळे राष्ट्रवादीचे बंडखोर असलेले घनश्याम चक्के हे भाजप पुरस्कृत उपनगराध्यक्ष झाले. राजकारणातल्या या अजब घडामोडीची चर्चा राज्यभर सुरू आहे.
वाई नगरपालिकेत झालेल्या घनघोर निवडणुकीत भाजपचे अनिल सावंत नगराध्यक्ष झाले तर बहुमत मात्र राष्ट्रवादीकडे राहिले. या निवडणुकीत भाजपला 10, राष्ट्रवादी काँग्रेसला 12 तर अपक्षाला एक जागा मिळाली होती. उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी वाईत निवडणूक झाली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. सभागृहात भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 12 आणि एक अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे विजय ढेकाणे, राष्ट्रवादीचे घनश्याम चक्केआणि अपक्ष सुशील खरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. चक्के जरी राष्ट्रवादीचे असले तरी राष्ट्रवादीने उमेदवारी मात्र अपक्ष सुशील खरात यांना दिली. मात्र, भाजपचे विजय ढेकाणे यांनी ऐनवेळी अर्ज माघार घेतला व भाजपने चक्के यांना पाठिंबा देऊन पुरस्कृत केले. त्यामुळे भाजप पुरस्कृत चक्के व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष खरात यांच्यात उपनगराध्यक्षपदासाठी लढत झाली.
भाजपकडे 10 सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 सदस्य असताना एका अपक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने उपनगराध्यक्षपदाचा उमेदवार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 सदस्यांपैकी एकाला फोडून भाजपने त्यालाच उपनगराध्यक्षपदाचा उमेदवार केले. त्यामुळे सभागृहात भाजपकडे संख्याबळ 11, राष्ट्रवादीकडे संख्याबळ 11 आणि 1 अपक्ष असे झाले. अपक्षाला राष्ट्रवादीची उपनगनराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने त्यांचे संख्याबळ 12 झाले. भाजपकडे 11 आणि नगराध्यक्षपदाचे एक मत मिळून त्यांचेही संख्याबळ 12 झाले. त्यामुळे निर्णय नगराध्यक्षांच्या कास्टिंग व्होटपर्यंत गेला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी हे कास्टिंग व्होट घनश्याम चक्के या राष्ट्रवादी बंडखोराला दिल्याने भाजप पुरस्कृत उपनगराध्यक्ष वाई नगरपालिकेत विराजमान झाला.
सत्ताधारी आणि विरोधी गटातील मतांचे पारडे सम-समान पडल्यानंतर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपल्या ‘कास्टिंग व्होट’चा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे घनश्याम चक्के यांना उपनगराध्यक्ष पदावर विराजमान केले. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या खळबळजनक बाब म्हणजे घनश्याम चक्के यांना राष्ट्रवादीकडून एकही मत मिळाले नाही. तसेच, त्यांचे सूचक व अनुमोदक हे दोघेही भाजपचे नगरसेवक होते. त्यामुळे हे पद नेमके कोणाच्या पारड्यात गेले?’ असा प्रश्न वाईकर विचारू लागले आहेत. राजकीय वर्तुळात यामागे भाजप तालुका अध्यक्ष दीपक ननावरे यांची रणनीती असल्याची जोरदार चर्चा आहे. ना. जयकुमार गोरे यांना दिलेले वचन पाळत, भविष्यात तालुक्यात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याचे संकेत या घडामोडीतून मिळत असल्याचे बोलले जात आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे शब्बीर पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, नगरपालिकेच्या विविध विषयक समित्यांची सदस्य संख्या सहा ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांनी नगरपालिका परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, मोहिते, बागुल यांच्यासह कर्मचार्यांनी सहकार्य केले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
हल्ली राजकारणात कोण कोणाचा नसतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. वाईची नगरपालिका जिंकण्यासाठी मकरंदआबांनी जीवाचे रान केले. अनिल सावंत नको अशी भूमिका राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी घेतली होती. ते ऐकून, त्यांच्यावर विश्वास ठेवून मकरंदआबांनी अनेकांना उमेदवार्या दिल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी अनेकजण अनिल सावंत यांच्या संपर्कात राहिले. एका बाजूला संपूर्ण सत्ता आणण्यासाठी मकरंदआबा प्रयत्न करत होते. दुसर्या बाजूला प्रत्येकजण स्वत:चे बघत होता. चक्के घड्याळावर लढले, कमळाविरोधात लढले, त्याच चक्के यांना सदस्य झाल्यानंतर मात्र कमळवाल्यांनी मते दिली तर जे घड्याळाच्या चिन्हाच्या उमेदवाराला पाडून अपक्ष निवडून आले त्यांना उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली गेली. मात्र, त्यांचा त्यात पाडाव झाला. राजकारणातली फार मोठी इंटरेस्टिंग स्टोरी वाईत घडली. शेवटी राजकारणाचा खेळखंडोबा व नैतिकतेचे धिंडवडे निघत जे एकमेकांच्या विरोधात लढले तेच नगरपालिकेत एकत्र दिसले.
वाईत गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात व अन्य बाबतीत असेच काही घनचक्कर घडत आहे. सरळ काही होतच नाही. त्यावर ‘पुढारी’ने प्रदीर्घ अशी ‘अग्गोऽऽ बाई... कसली ही वाई’ अशी वृत्तमालिका लिहिली होती. जी राज्यभर गाजली होती. वाईमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत जे काही घडलं त्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत जे घडलं ते सगळं पाहिल्यानंतर वाईकरांना पुन्हा एकदा ‘पुढारी’च्या ‘अग्गोऽऽ बाई... कसली ही वाई’ या मालिकेची आठवण झाली.