

वेळे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणारे भुईंज हे वाई तालुक्यातील मोठे गाव आहे. गावातून महामार्ग जात असल्याने येथील भुईंज ग्रामीण रूग्णालय सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे. मात्र, या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वारंवार रजेवर असल्याने रूग्णांच्या उपचाराची आभाळ होत आहे. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी हे खासगी दवाखान्यात असल्याने त्यांचे रूग्णालयात येणार्या रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रूग्णांचे हाल होत असून वारंवार रजेवर जाणार्या वैद्यकीय डॉक्टरांची हकालपट्टी करून नवीन डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वाई तालुक्यातील भुईंज गावालगत 15 ते 20 खेडेगावे आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी व आपत्कालीन परिस्थितीसाठी भुईंजच्या रूग्णालयाचे महत्व मोठे आहे. त्यामुळे 24 तास या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. परंतु, येथे असणारे वैद्यकीय अधिकारी हे असून नसल्यासारखे आहे. पंचक्रोशीतून दररोज नागरिक उपचारासाठी येत असताना डॉक्टरच बेपत्ता असल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. तसेच व्यवस्थित उपचार होत नसल्याने येथील रूग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.
या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा असली तरी तज्ञ डॉक्टर परिचारिका व इतर कर्मचार्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचार व किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. गंभीर उपचारांसाठी रुग्णांना नाईलाजास्तव सातार्याला किंवा खासगी रूग्णालयाकडे रेफर केले जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून वाई ते सुरूर रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे अपघात वाढू लागले आहेत. त्याचबरोबर वेळे, पाचवड, वाठार फाटा ते जोशी विहीर रस्ताही धोकादायक असल्याने रोज अपघात होतात. या परिसरात अपघात होत असल्याने जखमींवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, हे अधिकारीच जाग्यावर नसल्याने रूग्ण रूग्णालयात असला तरी त्याच्यावर उपचार होत नाही. केवळ वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्यानेही अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रारी करूनही त्यावर कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. रूग्णांचे हाल थांबवण्यासाठी वारंवार रजेवर जाणार्या वैद्यकीय अधिकार्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.
भुईंज रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णाला अनेकदा उपचाराची सुविधा नसल्याचे सांगत दाखलच करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. तसेच ओळखीच्या खासगी रूग्णालयांना रेफर करून पैसेही उकळले जात आहेत. त्यामुळे सरकारी सुविधा असूनही केवळ स्वार्थापोटी रूग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाले आहे.