

पाचगणी : दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणातून पाचगणीजवळ भोसे, ता. महाबळेश्वर येथे एका भिगवणच्या पर्यटकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीने फोन केल्यानंतर तिचे वडील व साथीदारांनी दारूच्या नशेतच युवकाला चिखलात तुडवून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये पर्यटक युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी मारहाण करणार्या संशयितांना अटक केली आहे.
अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) असे खून झालेल्या पर्यटक युवकाचे नाव आहे. तर सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनूर, ता. वाई) आणि अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी आला होता. त्यांनी भोसे येथील अतिथी व्हिला हॉटेल येथे मुक्काम केला होता. बुधवारी रात्री अक्षयने मद्यप्राशन केले होते. त्याचे अधिक मद्यप्राशन झाल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली होती.
काही वेळाने मित्र खोलीवर परत आले असता अक्षय खोलीत दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता खोलीच्या खालील बाजूस काही अंतरावर गर्दी आणि बॅटरीचा प्रकाश दिसून आला. त्यामुळे अक्षयच्या मित्रांनी तेथे धाव घेतली. यावेळी सूर्यकांत गोळे याच्या घरात डोकावल्याच्या कारणातून अक्षयला सूर्यकांत यांच्यासह संशयित लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले. यावेळी अक्षयचे मित्र आणि स्थानिकांनी संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यपान केलेल्या संशयितांनी कुणाचेही न ऐकता अक्षयला जबर मारहाण केली.
या जीवघेण्या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम पाचगणीनंतर वाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. परंतु, कुटुंबीयांच्या सूचनेनंतर अक्षयला बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला होता. यानंतर विशाल अजित जाधव यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. यानंतर स.पो.नि. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली संशयितांना अटक करण्यात आली.