

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारून विश्वास पाटील यांनी वैचारिक आत्महत्या केली आहे. धर्मांधांच्या सर्कशीत ते सामील झाले आहेत. शूद्र अतिशुद्रांच्या, शेतकर्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहून त्यांनी नाव कमावले होते. परंतु, प्रतिगामी विचारांच्या कळपात जाऊन त्यांनी आपल्या लेखनाची अवनीती करून घेतली आहे, अशी टीका विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. पाटणकर म्हणाले, विश्वास पाटील यांची काय होतास तू काय झालास तू अशी अवस्था झाली आहे. शूद्र अति शूद्र शेतकरी समाज जीवनाविषयी कादंबरी लिहिलेल्या विश्वास पाटील यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारुन स्वतःची अवनती करून घेतली आहे.
लेखक म्हणवल्या जाणार्या विश्वास पाटील यांचा मृत्यू होऊन नवीनच विश्वास पाटील तयार झाले आहेत. जाती व्यवस्थेची उतरंड मानणार्या लोकांच्या कळपात ते जाऊन बसले आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळण्याआधी त्यांनी बहुजन समाजाबद्दल व त्यांच्या आरक्षणाबद्दल केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आहे.
सातारा गॅझेटमध्ये जे 100 टक्के लोक कुणबी आहेत आणि आज मराठा म्हणून त्यांना आरक्षण नाकारले जाते, त्या कुणब्यांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. तेही कुणबी कुलोत्पन्न असल्यामुळे स्वतःच्या सर्व भावकीची आणि पूर्वजांची माफी मागावी आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी सोडावे, असे झाले नाही तर सर्व जनता सर्व शोषित जाती- जमाती आपल्या सातारा प्रवेशाला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. चुकीच्या छावणीत आणि विचारात प्रवेश करायला गेला आहात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृति या ग्रंथाची होळी केली होती, त्याच मनुस्मृती ग्रंथाला सध्याच्या केंद्र सरकारचे सल्लागार मोहन भागवत प्रमाण मानत आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी जातीची उतरंड या सरकारला पुन्हा निर्माण करायची आहे. स्त्रियांना गुलाम बनवणारी ही व्यवस्था आहे.
त्यामुळे पुरोगामी विचाराच्या लोकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला विरोध केला पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली. सातार्यात लवकरच विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कॉ. विजय मांडके, जयवंत खराडे, प्रा. डॉ. गौतम काटकर, प्रा. विजय पवार व इतर उपस्थित होते.