शंभूराज-सदाभाऊ यांच्यात ‘भांग युद्ध’

शंभूराज-सदाभाऊ यांच्यात ‘भांग युद्ध’
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात सातार्‍यात चांगलीच जुंपली. या दोघांमध्ये 'भांग युद्ध' रंगले. दोघांनीही एकमेकांचा एकेरी उल्लेख करत टीकेची झोड उठवली. खोत यांनी 'सत्ता भांग पिल्यासारखी असते, नशा उतरली की सगळं गेलेलं असेल', असे टिकास्र सोडले तर मंत्री देसाई यांनी प्रत्युत्तर देताना 'ते स्वत:च भांग पित असतील. त्यामुळे नशा काय असते हे त्यांना माहीत', असा पलटवार साधला. या दोघांमधील या जुगलबंदीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

खोत म्हणाले, सत्ता भांग पिल्यासारखी असते, नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल

सातारा : पुढारी वृत्तसेवा ; सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे माहीत नाही. कोण भाग्यवान माणूस आहे हे सुद्धा माहीत नाही. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो व बेहोश पडतो. मात्र, नशा उतरल्यावर शुद्धीत येतो. त्यावेळी सगळं गेलेलं असेल, अशी जहरी टिका रयत क्रांती संघटनेचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्यावर केली.

सातार्‍यात यशोदा कॅम्पस येथे वारी शेतकर्‍याची या पदयात्रेच्या बैठकीवेळी खोत यांनी टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, शेतकर्‍यांचा मोर्चा उन्हात निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक फोन केला नाही, ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ना एक अँब्युलन्स मिळाली, एका कार्यकर्त्याला चक्कर आली. एक अँब्युलन्स गाडी नाही देऊ शकले ते. शेतकरी हा क्रांतिसिंह नाना पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतून निघाला आहे. पालकमंत्री म्हणून एक फोन नाही करू शकत. आम्हाला कोणी काय द्यावे ही आमची अपेक्षा नाही कारण आम्ही अन्नदाते आहोत.

सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. ती अंगात आली की माणूस डुलायला आणि नाचायला लागतो, बेहोश पडतो. मात्र नशा उतरल्यावर शुद्धीत आलं की त्यावेळी सगळं गेलेलं असेल,अशा शब्दात खोत यांनी हल्लोबोल केला. ते पुढे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सातारा जिल्हा प्रशासन आमच्याशी जे वागले आहे त्याबाबत आम्ही मंत्री महोदयांना सांगणार आहे. सातारा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा आहे. पालकमंत्र्यांनी आमचे स्वागत करावे अशा अपेक्षाही नाहीत. आमची लढाई वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. धनदांडगे विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे. पालकमंत्र्यांमधून अपेक्षा नव्हत्या आणि नाहीत. त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. गेली 35 वर्षे शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि सुरूच ठेवणार असल्याचे खोत म्हणाले.

मंत्री देसाई म्हणाले, ते स्वत:च भांग पित असतील, त्यामुळे नशा काय हे त्यांना माहीत

सातारा : पुढारी वृत्तसेवा सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील. यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. त्यांनाच शेतकर्‍यांचा कळवळा आहे आणि आम्हा राज्यकर्त्यांना नाही का?, शेतकर्‍यांबद्दल आमचे सरकार संवेदनशील आहे,अशा शब्दात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी सदाभाऊंवर निशाणा साधला. ते म्हणाले, सदाभाऊच भांग पित असतील, यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे. याच नशेत त्यांनी हे वक्तव्य केलय. पण त्यांच्या पदयात्रेवेळी आम्ही आंदोलनकर्त्यांसाठी सगळी सोय केली होती. सर्व प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि अ‍ॅम्ब्युलन्स या सर्वांन अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी त्यांच्या संपर्कात होते. सदाभाऊंनी मोर्चा काढू नये, उन्हाचा त्रास होईल म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो परंतु त्यांनी ऐकलं नाही. सदाभाऊंना भेटायची माझी इच्छा होती पण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा होता, तसेच राज्यपालही सातार्‍यातून रत्नागिरीला रवाना झाले होते. त्यामुळे मी तिकडे गेलो, असं शंभूराजेंनी स्पष्ट केलं. कोठेही आमच्याकडून दुर्लक्ष झाले नाही. आमचे मंत्रिमंडळातील सहकार मंत्री अतुल सावे हे आले होते. अतुल सावे भेटल्यानंतर ही पदयात्रा त्यांनी स्थगित केली आहे. शेतकर्‍यांबद्दल आमचे सरकार संवेदनशील आहे. त्यांनाच शेतकर्‍यांचा कळवळा आहे आणि आम्हाला राज्यकर्त्यांना नाही, असं होत नाही. लवकरच सदाभाऊंच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल आणि प्रश्न सोडवले जातील, असे देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news