

वडूज : जगातील सर्वाधिक उंचीवरील शिखर माऊंट एव्हरेस्टवरूनही झेप घेणारा आणि सलग सतराहून अधिक तास हवेत उड्डाण करणारा ‘द हिमालयीन एअरलाईन’ म्हणून ओळखला जाणारा बार-हेडेड गूज अर्थात मराठीत पट्टेरी हंस हे16 परदेशी पक्षी सुर्याचीवाडी, ता. खटाव येथे दाखल झाले आहेत. थंडी वाढू लागल्याने खटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रे, सुर्याचीवाडी व येरळवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावांमध्ये परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून पक्षीनिरीक्षकांची पावले या तलावांकडे वळू लागली आहेत.
खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी व कानकात्रे या तलावांमध्ये दरवर्षी देशी-विदेशी पक्षी हजेरी लावत असतात. यंदा अद्याप देखण्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले नसले, तरी इतर विविध पक्ष्यांमुळे तलाव परिसर बहरला आहे. थंडी व दलदल वाढत चालल्याने पाणथळी पक्षी मोठ्या प्रमाणात दाखल होत असून त्यामुळे पक्षीनिरीक्षकांच्या आनंदात भर पडली आहे. तलावाच्या पश्चिमेकडील उथळ व पाणथळी भागात अन्नाच्या शोधात पक्ष्यांचे थवे दिसून येत आहेत. त्यामध्ये माऊंट एव्हरेस्टवरून झेप घेणारा पट्टेरी हंस हा या तलावाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पक्षीविश्वात त्याला ‘द हिमालयीन एअरलाईन’ तसेच सलग 17 तास न थांबता प्रवास करणारा पक्षी म्हणून ‘द हिमालयीन ट्रान्स’ असेही म्हटले जाते.