

सातारा : ‘गर्व से कहो...हम हिंदू है..’ असा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता; परंतु त्यांचे वारसदार म्हणून आलेल्यांना त्यांचा विचार पेलवला नाही. त्यामुळे ‘हिर्यापोटी गारगोटी’ ही म्हण खरी ठरली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.
ना. शिंदे हे दरे ,ता. महाबळेश्वर या आपल्या मूळगावी मुक्कामी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ना. एकनाथ शिंदे म्हणाले, 2019 मध्ये स्वार्थासाठी बाळासाहेबांचे, हिंदुत्वाचे विचार सोडले. त्याचा परिणाम निवडणुकांत झाला. आता लोक बरोबर राहत नाहीत, त्यांना सोडून जात आहेत. लोकांच्या मनातून हे उतरले आहेत. नाशिकमध्ये बाळासाहेबांचे लाखो शिवसैनिक आहेत. तिथे जाऊन बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप त्यांनी केले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.
स्वत: केलेले पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचा पोरकटपणा उबाठा गटाने केला आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे त्यांचा नकली आवाज काढून बाळासाहेबांची विचारधारा कोणालाही मिटवता येणार नाही. विधानसभेत 100 पैकी फक्त 20 जागा त्यांना मिळाल्या. शिवसेनेने 80 जागा लढवून 60 जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजे खरी शिवसेना कोणाची? हे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब झाले आहे. राम मंदिराला विरोध करणार्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले.
बाँबस्फोटातल्या आरोपीला बरोबर कोणी फिरवले, ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी नाही का? काही लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, मीत तर म्हणतो केवळ हिंदुत्वच नाही, तर यांनी लाजही सोडली आहे, अशी जहरी टीकाही ना. शिंदे यांनी यावेळी केली.