

सातारा : सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक तसेच साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. या साहित्य पंढरीत होत असलेले साहित्य संमेलन हे देशात सर्वात यशस्वी ठरलेले साहित्य संमेलन असेल. या जिल्ह्यात झालेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. कविवर्य बा. सी. मर्ढेकर स्मारक मार्गी लावणार, असे अश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर, अमेरिकेचे खासदार श्रीनिवास ठाणेकर, अ. भा. म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अ. भा. म. साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील आदि प्रमुख उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सातारा जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म पत्करले. जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळचे मंत्री शिवेंद्रराजे आहेत. लक्ष्मण गायकवाड यांनी त्यांच्याकडे केलेली मागणी योग्य आहे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ना. शिवेंद्रराजे यांच्यासोबत विनोद कुलकर्णी यांनी प्रयत्न केला. पत्रकारितेत त्यांचे योगदान आहे. मात्र त्यांच्यासोबत घडलेला प्रकार दुर्देवी व निषेधार्ह आहे. आयोजकांनी साहित्य संमेलनाचे अत्यंत नेटके नियोजन केले आहे. साताऱ्यातील साहित्य संमेलनत हे सर्वात यशस्वी ठरलेले साहित्य संमेलन असेल. बा. सी. मर्ढेकर स्मारक पूर्ण होण्यात अजितदादांनी मोठे योगदान दिले आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, कविवर्य बा. सी. मर्ढेकर स्मारकाचे अजितदादांनी सुरू केलेले काम मकरंदआबांना सोबत घेऊन पुर्णत्वाला नेऊ. निधी उभारून साहित्य परिषदेने हे काम केले आहे. मनाला भावेल असे स्मारकाचे काम केले आहे. स्मारकाची देखभाल दुरूस्तीसह स्मारकाचे राहिलेले काम सर्वजण मिळून पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
विश्वास पाटील म्हणाले, मराठी साहित्यात लेखक-प्रकाशकांची मोठी परंपरा आहे. साहित्यावर प्रेम करणारे खूप कमी लोक आहेत. ओरिसा, आसाम, केरळ याठिकाणी साहित्यावर मोठे काम केले जाते. जाती तसेच धर्माच्या नावावर जशी संमेलने होतात तशी ती भाषेवरही व्हायला हवीत. साहित्य रसिकांनी बा. सी. मर्ढेकर स्मारकाला भेट द्यावी, अशी मागणी केली.
विनोद कुलकर्णी म्हणाले, कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे गावात सरकारने स्मारक केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या स्मारकाची दूरवस्था झाली आहे. अजितदादांनी केलेले स्मारकाचे काम बंद अवस्थेत राहावे ही खंत आहे. मावळा फौंडेशनकडे स्मारक हस्तांतर करावे. मकरंद पाटील यांनी स्मारकाच्या देखभाल दुरूस्तीसाठी ताकद द्यावी. त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला असला तरी संमेलनाचे वातावरण टिकवून ठेवणार आहोत. माझ्यावर जीवघेणा हल्ला करून संमेलन उधळून लावण्याची अपप्रवृत्तींची भूमिका यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेल्या साहित्याने वेदना, विद्रोह आणि नकार ही मूल्ये जपत जीवनात व्यवस्थेविरूद्ध आलेले अनुभव लक्ष्मण गायकवाड यांनी सकसपणे मांडले. त्यांनी विद्रोहाचे रूपांतर विद्वेषात होऊ दिले नाही. त्यांच्या लेखनाला वेगळं परिमाण लाभलं आहे. व्यवस्था बदलावी यासाठी लेखणीतून वेळप्रसंगी रस्त्यावर संघर्ष करणारे ते लेखक आहे. मराठी साहित्य समृद्ध करण्यात लेखकांइतकंच प्रकाशकांचंही योगदान आहे. बाबूराव मैंदर्गीकर यांनी अनेक लेखकांचे साहित्य प्रकाशित केले असल्याचे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, श्रीनिवास ठाणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड व प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर तसेच अ. भा. मराठी साहित्य महामंडळ व मराठी साहित्य परिषद शाखांच्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले.