Ajit Pawar Death : कामांचा वेग, बारकावे अन्‌‍ विकासाची आस थांबली

औंधमध्ये अजितदादांच्या आठवणींना साश्रुनयनांनी उजाळा
Ajit Pawar Death
औंधमध्ये अजितदादांच्या आठवणींना साश्रुनयनांनी उजाळा
Published on
Updated on

औंध : ‌‘कामांचा झपाटा, सकाळची लगबग, फाईलींचा झटपट निपटारा, विकासकामांचा ध्यास आणि बारकाव्यांकडे असलेले लक्ष असा नेता पुन्हा होणे नाही,‌’ या शब्दांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाला औंधमध्ये गुरुवारी आयोजित शोकसभेत साश्रुनयनांनी उजाळा देण्यात आला.

अजितदादा पवार आणि औंध यांचे नाते गेल्या बावीस वर्षांत अतूट झाले होते. या कालावधीत औंध गावाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीने औंध गावावर शोककळा पसरली आहे. औंध शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अजितदादा पवार यांच्याकडे सोपवल्यानंतर दादांनी औंधच्या सर्व परिस्थितीचे सखोल अवलोकन केले. जुन्या व जीर्ण झालेल्या शैक्षणिक इमारती, पडझडीला आलेल्या संस्थानकालीन वास्तू, वस्तुसंग्रहालयाची जीर्ण इमारत, मूळपीठ डोंगराकडे जाणारे रस्ते, यमाई मंदिर परिसर, जुने रेस्ट हाऊस, ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था तसेच गावातील रस्त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी औंधच्या रखडलेल्या विकासकामांना गती दिली. कै. श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या पश्चात थांबलेला औंधचा विकास, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार यांनी पुन्हा मार्गी लावला. खऱ्या अर्थाने त्यांनी औंधचे पालकत्व स्वीकारत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले.

मागील दोन दशकांत अजितदादांनी औंधसाठी केलेल्या विकासकामांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत प्रसंगी हट्टाने दादांकडून विकासकामे मंजूर करून घेतली आणि औंधला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. अजितदादा पवार यांची औंधच्या श्री यमाई देवीवर अपार श्रद्धा होती. वार्षिक रथोत्सव तसेच नवरात्रोत्सवाला ते आवर्जून उपस्थित राहत. औंधचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा जतन झाला पाहिजे, ही त्यांची मनस्वी इच्छा होती. त्यामुळे शैक्षणिक विकासाबरोबरच सांस्कृतिक आणि धार्मिक विकासालाही त्यांनी चालना दिली. मात्र, 28 जानेवारी रोजी हा विकासप्रवासी प्रवास अचानक थांबला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच औंधमधील महिला, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

औंध येथे गुरुवारी आयोजित मूक फेरी व शोकसभेत हणमंतराव शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना भावनांना वाट करून दिली. ‌‘माझ्याकडे फक्त विकासकामांचे प्रस्ताव घेऊन या, बाकी काही नको. पाया पडू नका,‌’ असे अजितदादा कार्यकर्त्यांना ठणकावून सांगत असत, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.यावेळी आलीम मोदी, प्रमोद राऊत, शुभम शिंदे, अरुण रणदिवे, तानाजी इंगळे, जयवंत खराडे, दिपक नलवडे, संजय निकम, सोनाली मिठारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news