

कराड : शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांची अर्थवाहिनी असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिक बळकट करण्याला प्राधान्य देणार आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्व घटकांशी समन्वय साधत बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातून आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली. या निवडीनंतर बुधवारी सायंकाळी कराडमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार भोसले यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले.
आमदार भोसले म्हणाले, सातारा जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक असून जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून तिची ओळख आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याबरोबरच जिल्ह्यातील विविध प्रक्रिया उद्योग बँकेवर अवलंबून आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या बँकेची ही परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री तसेच सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही संधी मिळाली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व असलेल्या गटातून बिनविरोध निवड झाल्याचे सांगत, महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन बँकेत चांगले निर्णय घेतले आहेत. ही परंपरा कायम राखत बँक अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले, कराडचे विरोधी गटनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, उमेश शिंदे, माणिकराव पाटील, किरण मुळे, संग्राम चव्हाण, संजय शिंदे,माजी नगरसेवक महादेव पवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.