

नागठाणे : सासपडे, ता. सातारा येथे आर्या सागर चव्हाण (वय 13) या शाळकरी मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासांतच छडा लावला. अत्याचाराला विरोध केल्याने नराधमाने आर्याचा खून केल्याचे उघडकीस आले. संशयिताला शुक्रवारी रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर संतप्त जमावाने शनिवारी संशयिताला ताब्यात देण्याची मागणी करत त्याच्या घरावर हल्ला केला. प्रचंड दगडफेक करत जमावाकडून तोडफोडही करण्यात आली. जमावाच्या संतापाचा उद्रेक झाल्याने मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती दिल्यानंतर जमाव कसाबसा शांत झाला. त्यानंतर तणाव व शोकाकुल वातावरणात मृत आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल बबन यादव (वय 35, रा. सासपडे, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. या नराधमाचे घर मृत आर्या चव्हाण हिच्या घराशेजारी आहे.
आर्या चव्हाण या शाळकरी मुलीचा शुक्रवारी दुपारी 4 वाजता राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे याप्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. मृत आर्याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रूग्णालयात शुक्रवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. तोपर्यंत पोलिसांनी कसून तपास करत संशयित राहुल यादवला रात्री 9च्या सुमारास त्याच्या घरातून गजाआड केले.
दरम्यान, आर्याचा मृतदेह शनिवारी सकाळी सासपडे गावी नेण्यात आला. सकाळी 10 च्या सुमारास आर्याचा मृतदेह तिच्या घरासमोर आणला होता. त्यावेळी गावकरी घटनास्थळी दाखल होवू लागले. बघताबघता जमाव जमू लागला. काही क्षणातच प्रचंड संख्येने दाखल झालेला जमाव सैरभैर झाला. आर्याच्या मृत्यूला पोलिसही जबाबदार आहेत, असाही या जमावाचा रोख होता. सुमारे वर्षभरापूर्वी काहीशी अशीच घटना घडली होती. त्याचा तपास करून नराधमाला त्याचवेळी अटक केली असती तर ही वेळ आली नसती, अशा जमावाच्या भावना होत्या. अटक केलेला संशयित नराधम राहूल यादव याला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतला. जमाव काही केल्या कुणाचेच ऐकत नव्हता.
उपस्थित काही पोलिस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जमावाचा संताप एवढा अनावर झाला की तो कुणाच्याही ऐकण्यापलिकडे गेला. जमावाचा उद्रेक झाला. तो संशयित राहुलच्या घरावर चाल करून गेला. काहींनी घरावर दगडफेकही केली. काहीजण घरावर चढले. जमावाने या घराचे पत्रे उचकटून टाकले. जमाव संतप्त झाला होता. या प्रकाराने पोलिसांनी सातारहून आणखी कुमक मागवली. बोरगाव पोलिसांच्या साथीला सातारहून फौजफाटा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकारीही तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. डी.वाय.एस.पी.राजीव नवले,बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डी.एस .वाळवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.डी.वाय.एस.पी.राजीव नवले यांनी या प्रकरणातील संशयित राहुल यादव यास कठोरात कठोर शासन होईल तथापि ग्रामस्थांनी शांतता राखावी, पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जमावाने या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मृत आर्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. वरिष्ठ पोलिसांच्या आवाहनानंतर जमाव कसाबसा शांत झाला. त्यानंतर मृत आर्यावर शोकाकूल व तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.