

शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथे सातारा-लोणंद रस्त्यानजीकच असलेले एसबीआय बँकेचे एटीएम तीन चोरट्यांनी फोडून सुमारे 12 लाख रुपयांवर डल्ला मारला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. काही जागरूक नागरिकांना चोरट्यांची चाहूल लागली होती. त्यांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, सुमारे सात महिन्यांपूर्वीही हेच एटीएम फोडून सुमारे 13 लाख रुपये लांबवले होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवथर येथे सातारा-लोणंद रस्त्यानजीकच एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. एटीएम मुख्य रस्त्यालगतच असल्याने ग्रामीण भागातील लोकांबरोबर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालकही पैसे काढण्यासाठी थांबत असतात. मुख्य रस्त्यालगतच एटीएम मशीन असल्यामुळे चोरट्यांनी डाव साधला. त्यांनी रस्त्यावरच गाडी लावून त्यामध्ये गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. यादरम्यान चाहूल लागल्यामुळे काही जागरूक नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत एटीएममधून लाखो रुपयांची रोकड घेवून चोरटे पसार झाले. त्यांनी त्याच ठिकाणी गॅस सिलेंडर सोडून पळ काढला.
सातारा तालुका पोलिस व एलसीबीचे कर्मचारी, अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. एटीएम गॅस कटरमुळे जळाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधले होते. जागरुक नागरिकांनी धाव घेतली होती. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. सुमारे 7 महिन्यापूर्वी हेच एटीएम चोरट्यांनी फोडले होते. त्यावेळी चोरटे मोकाट सुटल्यामुळे पुन्हा एटीएम फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे.
मुख्य रस्त्यालगतच एटीएम असल्यामुळे कोणालाही चोरट्यांचा संशय आला नाही. घटनास्थळी पोलिस अधीक्षक तुषार जोशी, पोलीस उपअधीक्षक वैशाली कडुकर, सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे व एलसीबीचे कर्मचारी यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू आहे.