

लोणंद : वारकर्यांच्या अपूर्व उत्साहात व टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी पुण्यवान हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सोहळा आगमनानंतर वरुणराजाने काही काळ हजेरी लावली. ‘माऊली... माऊलींच्या...’ जयघोषात माऊलींच्या पादुकांना निरा नदीच्या पात्रात अभ्यंगस्नान घालण्यात आले. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकरी व भाविकांनी निरा नदीच्या दोन्ही तीरांवर मोठी गर्दी केली होती. वैष्णवांचा हा मेळा लोणंदमध्ये फक्त एक दिवस मुक्कामी राहणार असून भाविक भक्तिरसात चिंब झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सात मुक्कामानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास वाल्हे येथून प्रस्थान ठेवले. पिंपरे बुद्रुक येथील न्याहरी उरकून पालखी सोहळा निरा नदीच्या तिरावर दुपारच्या विसाव्यासाठी विसावला. पलीकडच्या तीरावर पुणे जिल्हा तर अलीकडच्या तीरावर सातारा जिल्हा अशा स्थितीत नदीच्या दोन्ही तीरांबरोबरच निरा नदीच्या पात्रातही वारकरी व भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. जसजसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी सर्वांचीच उत्सुकता वाढत चालली होती. दुपारी दीड वाजता तीन भोंगे झाल्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने निरा येथून प्रस्थान ठेवले.
निरा भिवरा पडता द़ृष्टी ।
स्नान करिता शुद्ध द़ृष्टी अंती ते वैकुंठ प्राप्ती ।
ऐसे परम श्रेष्ठी बोलिला ॥
रथापुढील 27 दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलींच्या पादुका ठेवलेला रथ निरा नदीच्या जुन्या पुलावरून सातारा बाजूच्या तीरावर येऊन थांबला. नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला सातारा पोलिसांनी दोरखंड घेऊन कडे तयार केले होते.
माऊलींच्या पादुकांना निरा नदीवरील दत्त घाटावर निरा स्नान घालण्यासाठी रथातून बाहेर काढून हातात घेतल्या. यावेळी नदीवरील पूल ते दत्त घाट या मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा प्रथमच वीर धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला पाणी असल्याने दत घाटावर ‘माऊली, माऊली, माऊलींच्या’ जयघोषात माऊलीच्या पादुकांना निरा स्नानासाठी नेण्यात आले. यावेळी वारकर्यांनी पाणी वर उडवून आनंद व्यक्त केला. सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने माऊलींच्या पादुका बॅरिकेट केलेल्या जागेतून स्नानासाठी नेण्यात आल्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. यावेळी प्रशासनाने जुना पुल ते दत्त घाट हा सुमारे 8 फुटांचा सिमेंट क्रॉक्रिंटचा रस्ता तयार केला असल्याने त्यावर फुलांचा गालीचा तयार केला होता.
हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही तिरावर व दोन्ही पुलावर वारकरी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माऊलीच्या पादुकांना अभ्यंगस्नान घातल्यानंतर पादुका पुन्हा रथात ठेवण्यात आल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. दुपारी पावणे तीनच्या सुमारास पालखी सोहळ्याने पाडेगाव ता. खंडाळा गावच्या हद्दीत सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर उत्साही वातावरणात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बँड व सलामी देऊन माऊलींचे स्वागत करण्यात आले. तसेच मशीनद्वारे गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. मनोजदादा घोरपडे, आ. सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, पोलिस उपअधिक्षक राहुल धस, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, सपोनि सुशील भोसले, नायब तहसिलदार हेमंत कामत, नायब तहसिलदार स्वप्निल खोल्लम, सोनिया गोरे, नितीन भरगुडे - पाटील, दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके - पाटील, राजेंद्र तांबे, मनोज पवार , अॅड. उदयसिंह पाटील, लोणंद बाजार समिती सभापती सुनील शेळके पाटील, शिवाजीराव शेळके पाटील, सागर शेळके, हर्षवर्धन शेळके- पाटील, ऋषिकेश धायगुडे - पाटील, अॅड. गजेंद्र मुसळे, बाळासाहेब शेळके बापूराव धायगुडे आदी मान्यवरांनी पुष्पहार व पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
यानंतर सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. पाडेगावपासून माऊलींचा पालखी सोहळा लोणंदकडे येताना पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव कॅनॉल, पाडेगाव पाटी, बाळूपाटलाची वाडी या ठिकाणी स्वागत करण्यात आले. पाडेगाव ते लोणंद असे सुमारे 7 किलोमीटरचे अंतर अडीच तासात पार करून माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी लोणंद नगरीत दाखल झाला.पालखी सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी व भाविकांची संख्या मोठी होती. वारी म्हणजे एकात्मतेचा संदेश, भक्तीची गंगा आणि परंपरेचा अमर प्रवाह.
हेची दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा॥
हा भाव वारकर्यांच्या ओठांवर आणि हृदयात दिसत होता.