

लोणंद : ‘वारी आली आनंदाची, लेवून परंपरा भक्तीची!’ अशा थाटात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. माऊलींच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून निरा नदीच्या पात्रात श्री दत घाटावर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर श्रद्धेचा हा महासागर ‘ज्ञानोबा-तुकाराम...’च्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्साहात सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. या सोहळ्यामुळे आता चार दिवस संपूर्ण जिल्हा भक्तिरंगात न्हाऊन निघणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, जि. प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, स.पो.नि. शिवाजी जायपात्रे, भाजपचे नेते डॉ. नितीन सावंत, खंडाळा सभापती छायाताई जाधव, उपसभापती संतोष वीर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माऊलींचा पालखी सोहळा निरा येथून दुपारी दीडच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर निरा नदीवरील जुन्या पुलावरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. निरा नदीच्या पाडेगाव तीरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येतील. प्रशासनाच्या वतीने दत्त घाटावर पादुका नेण्यासाठी नवीन काँक्रिटचा रस्ता व बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत.
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव ते लोणंद हे सुमारे सात किलोमीटर अंतर पार करून माऊलींचा सोहळा साधारणतः पाचच्या सुमारास लोणंदनगरीत प्रवेश करेल. त्यानंतर माऊलींची पालखी बाजार तळावरील पालखीतळावर नेण्यात येईल. या ठिकाणी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत व ‘माऊली... माऊली...’च्या गजरात समाज आरती होईल. ही समाजआरती या सोहळ्यातील लक्षवेधक क्षण समजली जाते. त्यानंतर माऊली एका दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीत विसावणार आहे.
पाडेगावची स्वागत कमान लक्षवेधक
माऊलींच्या पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाडेगाव या ठिकाणी ग्रामविकास खात्याच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे. ही स्वागत कमान ७२ फूट रुंद व ३५ फूट उंच एवढ्या आकाराची असून त्यावर विठ्ठल, ज्ञानेश्वर यांची चित्रे लावण्यात आली आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही वारकरी वेशातील फोटो लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर मृदंग, विणा, टाळ यांचेही चित्रे त्यावर लावण्यात आली आहे. ही स्वागत कमान वारकरी व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.