

तरडगाव : ‘ज्ञानोबा-माऊली’च्या जयघोषात, लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवार दि. 27 रोजी तरडगाव येथे आगमन होत आहे. या मुक्कामासाठी संपूर्ण तरडगाव नगरी सज्ज झाली असून, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वारकर्यांच्या सेवेसाठी आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधा अंतिम टप्प्यात आल्या असून, तरडगावकर माऊलींच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडलेली नाही. पालखी तळावर दर्शनासाठी सुलभता यावी म्हणून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र 200 फुटी बॅरिकेट्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाचे मैदान मुरुम टाकून, रोलिंग करून सपाट करण्यात आले आहे, तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. दिंड्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी असलेली झाडे-झुडपे काढून जागा स्वच्छ करण्यात आली आहे.
वारकर्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पालखी तळालगतच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहे उभारण्यात आली असून, परिसरात तब्बल 1800 निर्मलवारी शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय पथके आणि तात्पुरते दवाखाने विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, पालखी मार्गावरील सर्व विहिरींच्या पाण्याची तपासणी करून पाणी निर्जंतुक करण्यात आले आहे. संपूर्ण गावात आणि पालखी तळावर निर्जंतुकीकरण फवारणी केली जाणार आहे.
सोहळा काळात पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी 17 ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्याची सोय केली आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करून अडथळा ठरणार्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. लोणंद-फलटण मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ग्रामसेवक दीपक सोनवणे यांनी सांगितले. प्रशासनाच्या तयारीबरोबरच तरडगावकरांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
तरडगाव येथे दि. 27 जून रोजी सायं. 5 वाजता पालखी सोहळा मुक्कामी येत असून सोहळा दाखल होण्याआधी दुपारी चार वाजता पुरातन चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील अश्वांचे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची गर्दी याठिकाणी होत असते. यादृष्टीने प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी केली आहे. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. रिंगण कालावधीत सोहळ्यातील वाहनांना वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करुन स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.