Ashadhi Wari | श्रीरामनगरी भक्तिरसात चिंब

सोहळ्याचे उत्साही स्वागत; विठुनामाच्या गजराने दुमदुमली फलटणनगरी
Ashadhi Wari |
फलटण : श्रीरामनगरीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे भाविक व फलटणकरांनी उत्साहात स्वागत केले.Pudhari Photo
Published on
Updated on
पोपट मिंड

फलटण : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे फलटण शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा, चैतन्याचा, स्फूर्तीचा उत्सव माऊलींच्या विठ्ठलभक्तीचा, असे वातावरण निर्माण झाले आहे. अवघी श्रीरामनगरी माऊलीमय झाली असून भक्तिरसात चिंब झाली असून सारा परिसर विठुनामाच्या जयघोषात तल्लीन झाला असून वैष्णवांचा हा मेळा विमानतळ येथे असलेल्या पालखीतळावर विसावला.

पंढरीस जाऊ ।

रखुमादेवी वरा पाहू॥

डोळे निवतील कान।

मना तेथे समाधान॥

संता महंता होतील भेटी।

आनंदे नाचो वाळवंटी॥

ते तीर्थाचे माहेर।

सर्व सुखांचे भांडार॥

जन्म नाही रे आणिक।

तुका म्हणे माझी भाक॥

तुकोबारायांच्या अभंगातील या ओळीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली-माऊली पुकारात व विठ्ठल नामा’च्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा शनिवारी महानुभाव व जैन पंथीयांची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक फलटणनगरीत मुक्कामासाठी विसावला. तरडगाव येथील पालखी तळावरून सकाळी 6 वा. सोहळ्याच्या प्रस्तानानंतर सुरवडी येथे न्याहारी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेऊन श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत ‘माऊली माऊली’च्या गजरात सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला. शहरामध्ये पालखीच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत कमानी तर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सतीश कुंभार यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर मलटण, सद्गुरु हरिभाऊ मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक श्रीराम मंदिराजवळ आल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमानतळावर मुक्कामासाठी विसावला. वारीत सहभागी असलेल्या लाखो वारकर्‍यांसह शहर व तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली.

सकाळपासूनच वारकर्‍यांचे शहरात मोठ्या प्रमाणात आगमन सुरू होते. सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, भगव्या पताका यामुळे अवघी श्रीरामनगरी विठूमय झाली होती. शहरात दिवसभर विविध सहकारी, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, बँका, पतसंस्था, विविध मंडळे, फलटणवासीयांकडून ठिकठिकाणी मोफत चहा, बिस्किटे, अल्पोपहार, फळे वाटप, जेवण, आरोग्य सेवा, मोबाईल फोन चार्ज सेवा, आदी उपक्रम वारकर्‍यांसाठी सुरू होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांच्या सेवेसाठी लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक जण आपापल्यापरीने प्रयत्नशील होते. वारकर्‍यांच्या सेवेसाठी प्रशासनाने कोणतीही कसर ठेवली नव्हती.

तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयातून नियोजन केल्याने कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही. लाखो भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती झाल्यानंतर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दर्शन रांगेचे नियोजन केल्यामुळे गर्दी असूनही भाविक भक्तांनी शिस्तीचे पालन करुन माऊलींचे दर्शन घेतले. संपूर्ण फलटण शहर व परिसर माऊलीमय झाला होता. टाळ-मृदंगाच्या जोडीला माऊली माऊलीच्या होणार्‍या गजराने अवघी श्रीरामनगरी भक्तिरसात तल्लीन झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news