

फलटण : फलटण शहरातील पालखी मार्गाची दुरवस्था झाली आहे. याबाबत दै.‘पुढारी’मध्ये ‘वारकर्यांच्या वाटेवर फलटणमधील खड्डे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. सचिन पाटील यांनी शुक्रवारी प्रशासकीय अधिकार्यांसह पालखी मार्ग व विमानतळाची पाहणी केली. दरम्यान, रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी पालखी मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या.
यावेळी प्रांताधिकारी मनीषा आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोनि हेमंतकुमार शहा, बांधकाम विभागाचे आंबेकर, मुख्याधिकारी निखिल मोरे व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, माध्यमांशी बोलताना रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, आजवर पालखी मार्गावर पालखीच्या दरम्यान तात्पुरता मुरुम टाकून खड्डे बुजवले जात होते. आम्ही यावर्षी पालखी मार्गासाठी विशेष निधी मंजूर करून पूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचणीमुळे कामांना उशीर झाल्याने यावर्षी थोडी गैरसोय होत असली तरी पालखी मार्गावर बिलकुल खड्डा दिसणार नाही. पालखी मार्ग तातडीने खड्डेमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ. सचिन पाटील म्हणाले, पालखी मार्गावरील बहुतांश खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. शहरातील पालखी मार्गाची उर्वरित कामेही अधिकार्यांनी तातडीने मार्गी लावावीत. पालखी मार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे. याशिवाय शहरातील अन्य भागातील रस्त्याची कामेही उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करावीत. पालखी मार्गावर वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे नियोजन केले आहे.