

कराड :
भेटीलार्गी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी !!
संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिध्द असलेला आणि विठ्ठलाच्या ओढीचे वर्णन करणारा अभंग आहे. विठूमाऊलीच्या ओढीने आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या मनी सध्या हिच भावना आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या कराड तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या सध्या कराड शहरातून मार्गक्रमण करत असून, संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल... विठ्ठल..."च्या अखंड गजराने कराडच्या रस्त्यांवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, हातात टाळ, मृदंग आणि वीणेचा सुरेल नाद, तर ओठांवर अभंग... अशा भक्तिमय वातावरणात ज्येष्ठ वारकरी, महिला, युवक आणि बालवारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. दिंड्यांतील भक्ती, शिस्त आणि उत्साह पाहण्यासाठी नागरिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली जात आहे.
कराड शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सेवाभावाची परंपरा जपली जात आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सरबताची, चहाची, फराळाची तसेच अल्पोपहाराची व्यवस्था केली जात आहे. वारकऱ्यांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी अनेकांकडून स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतला जात असून या सेवेमुळे कराडकरांच्या आदरातिथ्याचे आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या श्रद्धेचे दर्शन घडत आहे.