

सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते 30 जून या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाडेगाव, ता. खंडाळा ते साधूबुवाचा ओढा फलटण या पालखी मार्गावर प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर एक अशा 15 ठिकाणी तात्पुरता ‘आपला दवाखाना’ उभारण्यात येणार आहे. तसेच 4 आयसीयू पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा परिषद व राज्य शासनाचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाने नियोजन करत सातारा जिल्ह्यात निरा ते बरड या मार्गावरील प्रत्येक 5 किमी अंतरावर खंडाळ्यात पाडेगाव, बाळू पाटलाचीवाडी, सईबाई सोसायटी, बाळासाहेब नगर, खंडाळा चौक, फलटणमध्ये काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल, नागरी आरोग्य केंद्र फलटण बाजार शाळेशेजारी, आपला दवाखाना सावतामाळी मंदिर, विडणी, पिंपरद. वाजेगाव, साधूबुवाचा ओढा अशा 15 ठिकाणी हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने स्थापन केले आहेत.
पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्कामी राहणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत असलेल्या 478 हून अधिक दिंड्यांचे आरोग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर शासकीय 12 व खाजगी 120 अशा मिळून 132 आरोग्य संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये 1 हजार 40 बेड उपलब्ध आहेत. तसेच प्राथमिक शाळांमध्ये 61, समाजमंदिरात 11 असे मिळून 72 ठिकाणी विविध कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पालखी तळ खंडाळा, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी 4 आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद, तरडगाव, बरड व उपजिल्हा रूग्णालय फलटण या प्रत्येक ठिकाणी 5 खाटांचे आयसीयू जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणार आहे.
यामध्ये फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, मॉनिटर, व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. पाडेगाव ते बरड सातारा जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत 46 फिरती वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक फिरत्या वैद्यकीय पथकांना नोंदणीकृत 480 दिंड्यांपैकी प्रत्येक पथकास किमान 10 दिंड्यांच्या संपर्कात राहून आरोग्य सेवा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पालखीतळ 4 आरोग्य पथके, 4 आयसीयू पथके, 15 आपला दवाखाना, 46 फिरते वैद्यकीय पथके, 102 रूग्णवाहिका 6, 108 रूग्णवाहिका 6 अशी 81 पथके वारकर्यांच्या मदतीला राहणार आहेत. 600 प्रथमोपचार किट दिंडीप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. पाडेगाव ते बरड मार्गावर हॉटेल व ओटी संनियंत्रण पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी 34 पथके, टँकर फिलिंग पाँईटसाठी 48 पथके स्थापन केली आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातारा, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद व उपजिल्हा रूग्णालय फलटण येथे 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. पालखी मार्गावर आरोग्य सेवा देण्यासाठी 810 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.