

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या लोणंद मुक्काम काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी संपूर्ण वीज वाहीन्या व ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करण्यात आली आहे. पालखी काळात वीजपुरवठा योग्य दाबाने व सुरळीत राहण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहीती राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शिवाजीराव रेड्डी यांनी दिली.
वीज वितरण कंपनीच्या वतीने माऊलीचा सोहळा खंडाळा तालुक्यात आल्यानंतर लोणंद ते तरडगावपर्यंतच्या पालखी मार्गालगत असणार्या लघुदाब व उर्च्चदाब वीज वाहीनीला अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या व झुडपे यांची छाटणी क्रेनच्या सहाय्याने करण्यात येत आहेत. त्याचबरोबर लोणंद गावातील सर्व रस्ते व प्रभागातील वीज तारांना अडथळे ठरणार्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. तसेच लोणंद व तरडगाव शहर, पाणीपुरवठा केंद्र यांना वीज पुरवठा करणार्या उच्च दाब वाहीनीची तपासणी व देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे. पालखी मार्ग व अन्य रस्ते यांना क्रॉसिंग करणार्या लघुदाब वाहीनीस स्पेसर व गार्डिंग बसवणे, जादा लांबी असणार्या गाळ्यात नवीन पोल बसवले आहेत.
वीज वितरण पेट्या अर्थिंग करण्यात आल्या आहेत. दोन्ही पालखी तळावरील ट्रान्स्फार्मरला तारेचे कुंपन केले आहे. पालखी तळावर दोन ठिकाणच्या उच्चदाब वस्हिनीचा वीज पुरवठा आणण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोणंद शहरातील लोखंडी विद्युत पोलला सहा फूट उंचीपर्यंत फायबर पाईपचे आवरण लावण्यात आले आहे. विद्युत तारा एकमेकांना चिकटू नये यासाठी गाळे वाढवून दुरुस्ती केली जात आहे. पालखी तळावरील धोकादायक असणार्या लाईटच्या पोलला संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे माऊलींच्या समाज आरतीला अडथळा ठरणारा हायमास पोल बाजूला शिप्ट केला आहे.
वाईचे प्रातांधिकारी राजेंद्र कचरे व खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील व वरिष्ठ अधिकारी यांच्या सुचनेनुसार वीज वितरणची सर्व कामे करण्यात येऊन ती अंतिम टप्प्यात आली आहेत. पालखी काळात सुरक्षतेच्याद़ृष्टीने सर्व कामाचे नियोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शिवाजीराव रेड्डी, सहा. अभियंता विकासकुमार रस्तोगी, अभियंता अमोल जाधव, कनिष्ठ अभियंता निखिल पाटील, शुभम वेदपाठक, पवन माने, अजित भंडारे यांच्यामार्फत सर्व कामे करण्यात येत आहेत. वारकरी व भावीकांनी आकडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये. तसेच कोणत्याही तुटलेल्या, पडलेल्या तारेस स्पर्श करू नका, धोकादायक परिस्थितीत महावितरण कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.