Asha Bhosale: आशाताई सेलिब्रेटीसारख्या कधीच वागल्या नाहीत

चोरे आशाताईंचे सासर; पतीच्या निधनानंतरही कुटुंबीयांशी नाळ कायम
Asha Bhosale
Asha BhosalePudhari
Published on
Updated on

कराड : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची चोरे (ता. कराड) ही सासरवाडी होती. स्वर्गीय गणपतराव भोसले यांच्याशी मुंबईत परिचय झाल्यानंतर त्यांनी विवाह केला होता. पतीच्या अकाली निधनानंतरही त्यांनी चोरे येथील कुटुंबीयांशी आपली नाळ कायम ठेवली होती. घरातील लग्नकार्य असो, अथवा शेतीतील एखादे काम असो, त्या नेहमीच मदत करत. त्यांनी आमच्यासाठी खूप केले आहे, अशा शब्दांत चोरेतील भोसले कुटुंबीयांनी आशाताई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

चोरे येथील गणपतराव भोसले हे तबला विशारद होते आणि यामुळेच त्यांची आशाताईंशी ओळख झाली होती. पुढे लग्न झाल्यानंतर सेलिब्रेटी असून त्यांचे चोरे येथील घरी येणे-जाणे होते. आशाताई सेलिब्रेटी होत्या, मात्र त्या चोरे येथे आल्यानंतर कधीही तशा वागल्या नाहीत.

आम्ही सर्वसामान्य आहोत आणि आमच्या प्रमाणेच त्या येथे आल्यानंतर वागत होत्या. त्यांनी घरी येऊन चुलीवरील भाजी भाकरी खाल्ली आहे आणि त्या जेवणाचे कौतुकही केले आहे. घरातील कोणाचेही लग्न असले तरी त्या आठवणीने मंगळसूत्र बनवून देत होत्या, अशा शब्दांत आशा भोसले यांच्या कुटुंबातील महिलांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलोपार्जित शेतीत विहीर काढण्यासाठी आणि पाईपलाईनसाठी त्यांनी आम्हाला मदत केली होती. त्या नेहमीच आमची विचारपूस करत होत्या, असे सांगत आशा भोसले यांच्या पुतण्याने भावनांना वाट मोकळी करून दिली.

घर पाहण्याचे स्वप्न अपूर्णच

आशाताई भोसले यांच्या चोरे येथील कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी नवीन घर बांधले आहे. हे घर पाहण्याची इच्छा आशाताई यांनी बोलून दाखविली होती. मात्र, ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. घर पाहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल्याचे सांगताना भोसले कुटुंबीयांना अश्रू रोखता आले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news