

कराड : पुढारी वृत्तसेवा
सांगितलेल्या थांब्यावर न उतरविता चालकाने रिक्षा पुढे नेल्यामुळे घाबरलेल्या एकट्या अल्पवयीन मुलीने रिक्षातून उडी मारली. हा प्रकार विद्यानगर (सैदापूर, ता. कराड) परिसरात बुधवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी चालकासह रिक्षा शहर पोलिस ठाण्यात आणली. तर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरातून तीन मुली विद्यानगर कॉलेज परिसरात रिक्षातून जात होत्या. त्यातील दोघी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात उतरल्या. तिसरी अल्पवयीन मुलगी आयटीआयकडे जाणार्या मार्गापर्यंत जाणार होती. या मार्गानजीक आल्यावर या मुलीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा तशीच पुढे नेली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने ओरडत रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेतली. हा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी रिक्षा थांबवत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस उपाधीक्षक ठाकूर, पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली.
अल्पवयीन मुलीसोबत विद्यानगर परिसरात घटना घडली आहे. रिक्षासह चालकही ताब्यात आहे. त्याची सखोल करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर सांगितले आहे.