

कराड : विजय दिवस चौकात का थांबला आहात? अशी विचारणा केल्याच्या रागातून कराड बसस्थानक परिसरात दोघांवर सशस्त्र हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सात जणांनी आम्ही कराडचे भाई असून जिवंत सोडत नाही असे म्हणत कोयत्याने वार केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून दोन्ही जखमींवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी इरफान आसिफ पठाण (मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली . साद अश्पाक मुलाणी (आझाद चौक), हुजेफा शब्बीर शेख (गुरुवार पेठ), सद्दाम गौसपाक शेख (कार्वे नाका), शोएब मोमीन (रैनाक गल्ली), फरहान शेख (मुजावर कॉलनी ), अकरम मुल्ला (पाली, ता. कराड) आणि अनोळखी एक अशा सातजणांवर गुन्हा नोंद झाला.
इरफान हा मंगळवारी रात्री बसस्थानक परिसराकडे कारमधून निघाला होता. त्यावेळी संशयितांसोबत इरफानचा चुलत भाऊ फरहान विजय दिवस चौकात उभा होता. इरफानने चुलत भावाला का थांबला आहे? अशी विचारणा केली आणि फरहानने काही नाही असे सांगितले. त्यामुळे इरफान मित्राच्या कारमधून बसस्थानकाकडे निघून गेला. मात्र काही वेळातच संशयित बसस्थानक परिसरात तीन दुचाकीवरूनआले.
त्यानंतर इरफानला आम्हाला का थांबला आहे, हे विचारणारा तू कोण ? तुला माहित नाही मी कराडचा भाई आहे, तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून शिवीगाळ करून साद मुलाणी अन्य संशयितांनी कोयता, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी इरफानला मारहाण केली. हे पाहून दर्शन शिंदे हा भांडणे सोडविण्यास आला असता त्यालाही कोयत्याने मारहाण केली. तसेच अन्य संशयितांनी इरफान आणि दीपक यांना मारहाण केली. वेळीच पोलिस गाडी आल्याने संशयितांनी पळ काढला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दहशत माजविण्याचा प्रयत्न
इरफान आणि दर्शन यांना कोयत्यासह दगड व लाथाबुक्क्यांनी संशयितांनी मारहाण करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अनर्थ घडण्याची शक्यता लक्षात घेत परिसरातील रिक्षा चालकांसह नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पेोलिस वेळीच दाखल झाल्याने अनर्थ टळला असला तरी टोळक्याच्या दहशत माजविण्याच्या प्रयत्नाने कराडसह परिसरात खळबळ उडाली.