

सातारा : आपण बाप होणार असल्याचा आनंद लुटण्यासाठी 1 महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या आरे, ता. सातारा येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव (वय 32) यांच्या अपघाती निधनाने परळी खोरे गलबलून गेले आहे. जवान प्रमोद यांच्या आरे गावातील माणूस ना माणूस व्याकूळ आहे. त्यांच्या आठवणींची वेदना गावातील प्रत्येक उंबऱ्यावर उमटली आहे.
रस्ते नि:शब्द झाले आहेत. कुणाच्याही डोळ्यातील पाणी थांबत नाही, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे ‘नियतीनं एवढं कठोर का व्हावं?, प्रमोद यांच्या नवजात बाळाचं स्वप्न का हिरावून न्यावं.’ या प्रश्नांनी अवघे आरे अश्रूचिंब झाले आहे.
प्रमोद जाधव 2014 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती लडाख (जम्मू, काश्मीर) येथे होती. पत्नी गरोदर असल्याने तिच्या प्रसुतीसाठी ते 1 महिन्याची सुट्टी काढून गावी आले असताना अपघाती मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली अन् शनिवारी सकाळी जवान प्रमोद यांना कन्यारत्न झाले. मुलीचे तोंड पाहण्याआधीच पित्याने डोळे मिटले होते.
शनिवारी सायंकाळी आरे या गावी जवान प्रमोद यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी सगळा परळी परिसरच नव्हे तर ज्यांना कळेल ते, देशावर प्रेम असणारे तरुण अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले होते. जवान प्रमोद यांच्या आरे गावातील माणूस ना माणूस हळहळून गेला आहे. सर्वत्र कमालीचा सन्नाटा आहे. वस्ती अबोल झाली आहे. गावकऱ्यांना हुंदके आवरत नाहीत. रस्ते निशब्द झाले आहेत.
प्रमोद यांची झालेली अकाली एक्झिट कोणीही विसरू शकत नाही. अश्रूंचा बांधही थांबता थांबेना. गाव काल रात्रीपासून सुन्न आहे. चौक ओस पडले आहेत. प्रत्येकाच्या तोंडी प्रमोद आणि नवजात बाळ यांचाच विषय निघत असून डोळे ओलेचिंब होत आहेत.