

कोरेगाव : अपशिंगे, ता. कोरेगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधील सहशिक्षक एस. एस. माने यांची अवेळी बदली करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी अपशिंगे येथे रास्ता रोको आंदोलन केले.
शैक्षणिक वर्ष सुरू असताना अचानक बदली करण्यात आल्याने ती तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी अपशिंगे सरपंच प्रवीण भोसले म्हणाले, वसंतदादा हायस्कूलमधील सर्व विद्यार्थी व पालक शिक्षकाच्या अवेळी बदलीमुळे चिंतेत आहेत. बदलीचे कोणतेही ठोस कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिक्षकांनी गेल्या वीस वर्षांत चांगल्या पद्धतीने अध्यापन केले आहे. त्यामुळे किमान शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत बदली करू नये.
दरम्यान, संस्थेचे सचिव एस. के. माने यांनी सांगितले की, सहशिक्षक एस. एस. माने यांची बदली यापूर्वी तीन वर्षांपूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी काही ग्रामस्थांच्या हस्तक्षेपामुळे ती रद्द झाली होती. शासनाच्या ‘पवित्र’ पोर्टलवरील शिक्षण भरती प्रक्रियेनुसार शाखानिहाय व विषयानुसार माहिती देणे आवश्यक असते. पुढील शैक्षणिक वर्षाचा विचार करूनच सदर बदली करण्यात आली आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही.