

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने 2026 मधील सर्व प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार आयडी) अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड, क्रेडिटस् आणि गुण डिजिटल स्वरूपात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटस्मध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा 12 अंकी युनिक डिजिटल आयडी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा आरसा ठरणार आहे. बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व निकाल आणि प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे या आयडीशी लिंक राहतील. यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या हार्ड कॉपी बाळगण्याची गरज उरणार नाही. सीईटी अर्ज भरताना हा आयडी अनिवार्य आहे. यासाठी आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे. तसेच आधारवरील नाव आणि जन्मतारीख शैक्षणिक कागदपत्रांशी सुसंगत असावी. यातून पारदर्शकता येईल, असा विश्वास सीईटी सेलने व्यक्त केला आहे.