

सातारा : सध्या सर्वत्र जाती धर्मामध्ये विद्वेष निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जाती-धर्माच्या भिंती तोडण्यासाठी कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करणार्या वधू-वर व पालकांना नावनोंदणीची संधी मिळणार असल्याने जाती-धर्माच्या भिंती तुटण्यास मदत होणार आहे.
अंनिसच्यावतीने हे राज्यस्तरीय आंतरजातीय, आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना याची पडताळणी केली जाते. सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यासह राज्यातील आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विधवा- विधुर विवाह इच्छुकांनी आपली माहिती या केंद्र समन्वयक शंकर कणसे सातारा, डॉ. ज्ञानदेव सरवदे, बारामती यांच्याकडे किंवा आपल्या गावातील अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.
आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवते. मात्र, जात, धर्म न मानणार्या पालकांना किंवा वधू-वरांसाठी केंद्र कुठेही नाही. अंनिस मार्फत आजअखेर शेकडो आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह लावण्यात आले आहेत. त्या मुला- मुलींना महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र म्हणजेच सेफ हाऊस जिल्ह्यात सुरु केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे वधूवर सूचक केंद्र राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य व सेफ हाऊसच्या माध्यमातून सुरक्षाही मिळणार आहे.